लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद करण्यात डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला यश

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
डहाणू इराणीरोड येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढून घरी परत जात असताना त्यांच्या ताब्यातील 5 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीला अवघ्या अर्ध्या तासात डहाणू आणि कासा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद केले आहे. सध्या हा आरोपी डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या ताब्यात आहे.
डहाणू पारनाका येथे राहणारे अमित तात्याराव घोरुडे वय वर्ष( 28 ) शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता डहाणू पारणाका येथे असलेल्या भारतीय स्टेट बँकेतून 5 लाख 50 हजार रुपयांची रक्कम काढून आपल्या जुपिटर दुचाकी गाडीने घरी जात असताना गणेश पांडुरंग दळवी आरोपी राहणार जव्हार यांनी अमित घोरुडे यांना जाणून बुजून धक्का मारून गाडीवरून खाली पाडून त्यांच्या जुपिटर दुचाकीच्या डिक्कीतून हिसकावून जबरदस्तीने 5 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाले होते.

याबाबतची माहिती अमित घोरुडे यांनी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शशिकांत कदम, पोलीस शिपाई उमेश थाळेकर आणि पोलीस नाईक मनोज भरसट यांना दिल्यावर त्यांनी त्वरित डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी कासा चारोटी पोलीस ठाणे हद्दीत जात असताना स्पष्ट दिसल्यावर त्यांनी कासा पोलिस ठाण्यातील हवालदार रणजीत वसावला,पोलीस शिपाई वाहतूक शाखा राजेंद्र ठाकरे यांच्याशी संपर्क करून माहिती दिल्यावर कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चारोटी नाक्यावर नाकाबंदी करून कासा पोलीस आणि डहाणू पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून कासा चारोटी पोलीस ठाणे हद्दीत या आरोपीला रोख रकमेसह अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर,डहाणू पोलीस ठाणे पोलीस शिपाई शशिकांत कदम, पोलीस शिपाई उमेश थाळेकर, पोलीस नाईक मनोज भरसट , आणि कासा पोलीस ठाणे हवालदार रणजीत वसावला, आणि पोलीस शिपाई वाहतूक शाखा राजेंद्र ठाकरे, पोलीस हवालदार मंगेश वनगा वाहतूक शाखा या पथकाने केली आहे.



