विशेष

रमजानुल मुबारक -१५ इस्लामचे चौथे मूलतत्व-जकात

इस्लाम धर्माची जी पाच मूलतत्वे प्रामुख्याने मानली गेली आहेत.पहिला कलमा, दुसरी नमाज,तिसरा रोजा,चौथी जकात व पाचवे हज.यापैकी जकात ची अदायगी प्रामुख्याने रमजान महिन्यात केली जाते.रमजान महिन्यात रोजा आणि नमाज सोबतच जकात प्रामुख्याने आदा केली जाते.समाजातील सधन वर्गाने (साहिबे निसाब) जकात ही दयावयाची असते.यासाठी ज्याच्या कडे साडेसात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा त्यांच्या किंमतीची रोख रक्कम शिल्लक आहे अशी व्यक्ति जकात आदा करण्यासाठी पात्र समजली जाते.बहुतांश लोक रमजान महिन्यातच जकात दयावी असे समजतात मात्र तसे नाही.तुमच्या नफ्याच्या मालाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा जकात दिली पाहिजे. रमजान महिन्यात मिळणारे जास्त पुण्य प्राप्त व्हावे या हेतूने जकात या महिन्यात देण्याकडे कल जास्त असतो.समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. कुणी गरीब राहू नये, असेल तर त्याच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने हजरत पैगंबरांनी जकातीची ही व्यवस्था निर्माण केली.समाजातील अगदी शेवटचा घटक देखील वंचित राहू नये हा या मागचा मुख्य उद्देयश आहे.समाजातून गरीबीचे उच्चाटन करणे हा देखील हेतू आहे.तसेच समाजातील वृध्द, विधवा,अनाथ यांचे पालनपोषण करणे, गंभीर आजारी रुग्णांना मदत करणे, शिक्षणासाठी हातभार लावणे हा आहे.जकात आदा केल्याने आपल्या व्यापार उदिमात वाढ होते.बरकत येते.जे व्यापारी किंवा ईतर व्यावसायिक वर्षभराच्या आपल्या व्यापार, व्यवसायाचा काटेकोरपणे हिशोब करुन योग्य ती जकात आदा करतात त्यांची भरभराट झालेली पहावयास मिळते तर जे याबाबत कुचराई करतात त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात.आपल्याकडे प्रामुख्याने धार्मिक पाठशाळा (मदरसा) ना जकातीची रक्कम मोठया प्रमाणावर दिली जाते.या रकमेतून मदरसात शिकणाऱ्या मुलामुलींचा जेवण, कपडे व राहण्याचा खर्च भागविला जातो. अलिकडच्या काळात शिक्षणासाठी ही या रकमेचा सदुपयोग केला जात आहे.गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च जकात च्या रकमेतून केला जात आहे.अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती याबाबत अग्रेसर आहेत.जकात देतांना ती देण्याचे जाहीर प्रदर्शन टाळावे, घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पध्दतीने दयावी.गरजूंचा शोध घेऊन शक्य तो गुप्तपणे त्यांची मदत करावी.ही मदत अल्लाहच्या मर्जीसाठी दिली जात असल्याने तोच याचा मोबदला आपल्याला देईल ही श्रध्दा त्यामागे असावी.गरिबी व दारिद्र्य निर्मूलन हा जगातील मागचा मूळ उद्देश आहे. हजरत पैगंबर यांच्या काळात जगात व्यवस्था लागू झाल्यानंतर अवघ्या सात वर्षात मदिना मधील सर्व गरिबीचे निर्मूलन झाले होते.हैदराबाद येथील एका संस्थेच्या पाहणीनुसार दरवर्षी फक्त भारतातील मुस्लिम समाज सत्तेचाळीस हजार कोटी रुपये जकातीच्या रूपाने दान करत असतो. मात्र या रकमेचा सुयोग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने भारतातील मुस्लिमांची गरिबी कमी होताना दिसत नाही.यासाठी देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर योग्य नियोजनाची आवश्यकता आहे.(क्रमशः)

*सलीमखान पठाण* 9226408082.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
21:46