पालघर जिल्ह्यातील सफाळे रोडखड येथील जिल्हा परिषदेची शाळा बनली रोल मॉडेल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक _7030516640.
पालघर जिल्ह्यातील सफाळे केंद्रातील जिल्हा परिषदेची रोडखड ही शाळा शिक्षक, पालक व सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पालघर तालुक्यातील शाळांसाठी रोल मॉडेल शाळा ठरली आहे.
या शाळेच्या सर्व भिंतींवर सुंदर रंगकाम करून चितारलेल्या चित्रातून अभ्यासक्रम मांडला आहे.
मुलांना या चित्राद्वारे अभ्यास अतिशय परिणामकारकतेने व सहजपणे करता येत आहे.
सफाळे रोडखड गावात बहुसंख्य आदिवासी समाज असून या गावातील लोक अतिशय गरीब आहेत. याआधी या शाळेच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली होती. सदर शाळेतील शिक्षिका जागृती चौधरी यांनी अन्य शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच या भागातील मुलांनी नियमित शाळेत यावेत व त्यांचे शिकण अधिक परिणामकारक होण्यासाठी इमारत दुरस्तीच्या कामासाठी समाजातील विविध माध्यमातील नागरिकांच्या मदतीने शाळेची सुधारणा केली.
यात नुकताच गोदावरी व लक्ष्मी वेट फाऊंडेशनचे विजय निकम यांच्या माध्यमातून इमारतीसाठी पत्रे आणि भिंतीच्या रंगरंगोटीसाठी आर्थिक स्वरूपात मदत केल्याने शाळेचे रुपडे पालटून ही शाळा पालघर तालुक्यात रोल मॉडेल ठरली आहे. या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडला. यावेळी शिक्षिका जागृती चौधरी यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या दुरुस्तीसाठी शिक्षक, पालक, सेवाभावी संस्था यांनी केलेल्या सहकार्याचे आभार मानले.
तसेच शाळेला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी पुन्हा पुन्हा सहकार्य करण्याबाबत विनंती केली. तर सरपंच तनुजा कवळी यांनी भविष्यात शाळेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन केले. यावेळी गोदावरी व लक्ष्मी वेट फाऊंडेशनचे विजय निकम, उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच तनुजा कवळी, पत्रकार नवीन पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



