भाजपा ज्येष्ठ नेते विजय सालीम यांच्या निधनाबद्दल माजी आमदार बाळ माने यांनी केला शोक व्यक्त
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती विजय सालीम यांचे आज दुःखद निधन झाले. भाजपातर्फे माजी आमदार बाळ माने यांनी शोक व्यक्त केला, तसेच भाजपातर्फे श्रद्धांजली वाहिली. जवळचा मित्र, सहकारी, तळागाळात ओळख असलेला कार्यकर्ता हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सालीम यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. विजय सालीम यांच्यावर आज रात्री १० वाजता जाकिमिऱ्या, अलावा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल बाळ माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, कणखर नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अशी सालीम यांची कारकिर्द होती. कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारा, तळागाळात पोहोचणारा हा कार्यकर्ता गेल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगी सालीम यांच्या कुटुंबीयांसोबत भाजपा परिवार उभा राहील. या दुःखातून बाहेर येण्याकरिता परमेश्वर त्यांना ताकद देवो, अशी प्रार्थना करतो. शिक्षण सभापती म्हणून सालीम यांनी चांगले काम केले होते. तसेच जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी म्हणूनही पक्षात २५ हून अधिक वर्षे योगदान दिले होते.