आर्थिक

काम अपूर्ण, खर्च दुप्पट, मुंबई – गोवा महामार्गावर 12 वर्षात 7,300 कोटी खर्च

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील बारा वर्षापासून रखडले आहे. बारा वर्षात महामार्गाच्या कामावर नियोजित खर्चापेक्षा दुप्पट खर्च झाल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. मुंबई-गोवा 440 किमी महामार्गावरील 112 किमी मार्गाचे अद्याप चारपदरीकरण बाकी असून, महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी डिसेंबर 2023 ची मुदत होती. जितेंद्र घाडगे यांनी आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य बांधकाम विभागाने आत्तापर्यंत 7,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये महामार्गाचे चौपदरीकरणासह बोगदे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि बाह्य रस्ते यांचा समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 3,500 ते 4,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पनवेल ते इंदापूर पर्यंतचा 84 किमीचा मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात आला. त्यानंतर उरलेल्या 355 किमी मार्गाचे काम राज्य बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. यासाठी सुरुवातीला 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, दरम्यान, सध्या या मार्गासाठी आत्तापर्यंत 1,200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप 28 किमी मार्गाचे रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे. तसेच, राज्य बांधकाम विभागाकडे असलेल्या कामासाठी आत्तापर्यंत 6,100 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप 84 किमी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे. मुंबई- गोवा महामार्गावर 2010 पासून 2,500 जणांचा मृत्यू झाला आहे, असे घाडगे यांनी मिळलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button