शहर

“देवाच्या सेवेपेक्षा आईची सेवा श्रेष्ठ!” अकलूजच्या मटण मार्केटमधील ‘महादेवा’ने सायकलवरून घडवली मातृभक्तीची वारी

​अकलूज (प्रतिनिधी):सोमनाथ पवार Times 9 Marathi News Network

“आई माझी मायेचा सागर, आईवर मुलाचं प्रेम हे देवांच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ असतं,” याची प्रचिती आज अकलूजमध्ये पुन्हा एकदा आली. भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आजच्या जगात, एका मुलाने आपल्या वृद्ध आईला सायकलवर बसवून फिरवतानाचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले, तर अनेकांनी या मातृप्रेमाला सलाम केला.

आज महावीर स्तंभ परिसराकडून तलाठी कार्यालयाकडे जात असताना एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. अकलूज येथील मटण मार्केट परिसरात राहणारे महादेव नावाचे गृहस्थ आपल्या वृद्ध आईला सायकलवर बसवून घेऊन जात होते. विशेष म्हणजे, आपल्या मुलाच्या सायकलवर बसून फेरफटका मारताना त्या माउलीच्या चेहऱ्यावर जे ‘स्मित हास्य’ होते, ते लाखो रुपयांच्या कारमध्येही मिळणार नाही, असे समाधान व्यक्त करत होते.

आजच्या धावपळीच्या युगात जिथे वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष द्यायला तरुणांकडे वेळ नाही, तिथे महादेव यांनी आपल्या आईला सायकलवर फिरवून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीतून “आईची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हा संदेश अधोरेखित झाला आहे.

​आज हे दृश्य ज्यांनी ज्यांनी पाहिले, त्यांच्या मनात आनंदाची एक वेगळीच लहर निर्माण झाली. सायकलवरचा हा आनंदाचा प्रवास बघून उपस्थित नागरिकांनी महादेव यांच्या मातृप्रेमाचे भरभरून कौतुक केले असून, “खरोखरच या लेकराला मानाचा मुजरा,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button