करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे एप्रिल 2023 पासूनचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे,माजी आमदार नारायण आबा पाटील यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान एप्रिल २०२३ पासून थकीत असून त्वरित सदर अनुदानाची रक्कम संबंधित खात्यावर जमा केली जावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे केली. याबाबत एक लेखी निवेदनही कृषिमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पद्धतीने शेती करावी म्हणून आकृष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून एक ठिबक सिंचन अनुदान योजना कार्यान्वित आहे.
यामध्ये शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते तसेच पात्र शेतकऱ्यास ठिबक सिंचन योजनेसाठी जवळपास ८० टक्के अनुदान दिले जाते. या ८० टक्के अनुदान रकमेपैकी केंद्र सरकार ५५ टक्के रकमेची हमी उचलते तर राज्य सरकार २५ टक्के अनुदानाची जबाबदरी घेते. यामुळे शेतकरी हा आपली शंभर टक्के रक्कम गुंतवून या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवतो. करमाळा तालुक्यातील जवळपास दीड हजार शेतकरी या योजनेत सहभागी असून त्यांचे एप्रिल २०२३ पासून ते आजतागायत आठ महिने झाले एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. या उलट या योजनेचा प्रारंभिक खर्च शेतकरी पदरमोड करून बसले आहेत. यामुळे सदर अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा केली जावी अशी मागणी आपण लेखी निवेदन देऊन केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले
हा करमाळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न असून अशी दिरंगाई झाल्यास शासनाच्या एका चांगल्या योजनेत सहभागी होण्यास शेतकरी पुन्हा धजावणार नाहीत. शेतीसाठी ठिबक योजना राबवून पाणी वाचवण्याचा शासनाचा उद्देश सफल होणार नाही तरी त्वरित या थकीत रकमेची बिले लाभार्थी शेतकऱ्यांना अदा केली जावीत. लवकरात लवकर जर हा प्रश्न नाही सोडवला गेला तर शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला जाणार असून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलनाची भूमिका वेळप्रसंगी बजावू असेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.



