बेंद ओढ्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जन आंदोलन या दोन्हीची गरज – सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी राजकारण बाजूला ठेऊन बेंद ओढ्याचे योग्य पुनर्जीवन झाल्यास हजारो एकर वाढीव क्षेत्र ओलिताखाली येईल. जो पर्यंत बेंद ओढ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शंभर टक्के माढा तालूका सिंचनाखाली आला असे म्हणता येणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक सुनील तळेकर यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की १९९५ पासुन बेंद ओढ्याचा प्रश्न सुटत नाही.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा हा जलसंधारण प्रकल्प असून २०००० हुन अधिक पाणलोट क्षेत्र यावर अवलंबुन आहे. सुमारे ३४ किमी लांबीचा हा जलस्त्रोत केवळ ओढा नसुन ही एक लहान नदीच आहे. जवळपास तेरा गावाहुन अधिक गावांच्या शेती प्रश्नाशी निगडीत असल्याने बेंद ओढा प्रश्न कायमचा सुटणे गरजेचे आहे. सध्या दुष्काळ वजा सदृश पाणी टंचाई जाणवत असुन कुर्डु, पिंपळखुटे, ढवळस, पिंपरी, भोसरे, भोगेवाडी, वडाचीवाडी यासह अन्य गावांना बेंद ओढ्याचे महत्व जाणवत आहे. मानेगाव उपसा सिंचन योजना असो वा बार्शी उपसा सिंचन योजनेत माढा तालुक्यातील पाच गावांचा समावेश असो, ही कामे महत्वाची आहेत.
परंतू या कामासाठी जेवढा पाठपुरावा लोकप्रतिनिधी कडून होतो तेवढा पाठपुरावा बेंद ओढा पुनर्जीवन करण्यासाठी होत नाही. यामुळेच मग नाम सारख्या पाणी फौंडेशनच्या माध्यमातून या ओढ्याचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला गेला. आज भोसरे गावाचा उत्तरेकडील भाग हा पाण्यापासून वंचित आहे. बेंद ओढ्यातुन तीन किमी बंदीस्त पाईपलाईन द्वारे जर वनविभागाच्या तळ्यात पाणी आणता आले तर हा भाग ओलिताखाली येईल.
असे एक ना अनेक लहान मोठे प्रश्न बेंद ओढ्याचा मुळ प्रश्न सुटल्यावर आपोआपच सुटतील. सुमारे 60 लहान-मोठ्या चेक बंधा-यांची जर किरकोळ दुरुस्ती केली गेली तर पाण्याचा वापर अधिक फायदा मिळवून देईल. बेंद ओढ्यातील पाणीसाठा सुधारण्यासाठी डिसिल्टिंगची गरज आहे. खोलीकरण आणि रुंदीकरण ही कामे जवळपास नऊ किमी हुन अधिक क्षेत्रात काही प्रमाणात झाली आहेत.
बेंद ओढ्यास राज्यशासनाच्या मोठ्या निधीची गरज आहे. जर योग्य प्रमाणात निधी उपलब्ध केला गेला तर बेंद ओढा हा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायीनी ठरेल. पण तरीही आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबित का राहीला जातोय याबद्दल मोठ्या प्रमाणात चिंतन होऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत सुनील तळेकर यांनी व्यक्त केले.



