पुरानी दुश्मनी..गळा आवळून केला खून..फरार पाच आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या अज्ञात मयताच्या प्रकरणाचा पालघर पोलिसांनी वेगवान आणि कौशल्यपूर्ण तपास करून उलगडा केला असून
या खुनाच्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
१२ जुलै २०२५ रोजी कसारा पोलिसांकडून मोखाडा परिसरातील वैतरणा धरणाजवळ एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर खोडाळा दूरक्षेत्राच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाच्या दोन्ही पायांना जंगली वेली बांधलेली असल्याने संशयित परिस्थितीत मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (A.D.) क्रमांक २३/२०२५ नोंदवण्यात आला होता.
तपासात मृत व्यक्तीची ओळख शरद कोंडाजी बोडके( वय वर्ष 31 ) रा. मोहाळे, ता. इगतपुरी (नाशिक) अशी पटली. मृतदेहाची स्थिती आणि आढळलेल्या पुराव्यांवरून खुनाचा संशय बळावला. नातेवाईकांकडून चौकशी केल्यानंतर १३ ऑगस्ट २०२५ रोजी खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके कार्यरत करण्यात आली. मृतकाच्या गावात सखोल चौकशी, तांत्रिक तपास आणि पुराव्यांचे विश्लेषण करत पोलिसांनी पाच आरोपींचा शोध लावला. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मयत शरद बोडके हा आरोपी संतोष धात्रक यांच्याशी वारंवार वाद घालत असे. पूर्वी झालेल्या भांडणात बोडके याने आरोपीच्या आई–वडिलांना मारहाण केली होती आणि त्याच्या मामाचा पाय मोडला होता. याचा राग मनात धरून सर्व आरोपींनी संगनमताने कट रचला.
योजनेनुसार संतोष ( उर्फ) अरुण लक्ष्मण धात्रक (36), शिवराम लक्ष्मण वाघ (29), गोकुळ पांडुरंग बेंडकोळी (29), गणेश बेंडकोळी (22), संजय पोटकळे (30) या पाच आरोपींनी मृतास दारू पाजण्याच्या बहाण्याने त्यांच्या स्विफ्ट डिझायर (MH15JW0807) कारमध्ये बसवून जांभळपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे नेले. तेथे मृतास दारू पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे पाय जंगली वेलीने बांधून तो कारमध्ये टाकत मोखाडा परिसरातील वैतरणा धरणाजवळ फेकून आरोपी पसार झाले. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करीत आहेत.
ही यशस्वी कामगिरी आणि कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी भरत मेहेर आणि पोलीस निरीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा) प्रदिप पाटील यांच्या सूचनांवर आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, उपनिरीक्षक वानखेडे, खोत, श्रीकांत दहिफळे, प्रतीक पोकळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे.



