महाराष्ट्र

सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी देशभक्तीमय वातावरणात संपन्न.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

“रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा….
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा….
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा….
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा….”

सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या शुभहस्ते व सिरम इन्स्टिट्यूट, पुणे चे शास्त्रज्ञ सोमनाथ पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा इतिहास सांगून स्वातंत्र्यदिन साजरे करण्याचे महत्व सांगितले तसेच देश सर्व क्षेत्रात प्रगती करत असून लवकरच जगात महासत्ता निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला.

सयाजीराजे वाद्यवृंदाने राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, ध्वज गीत सादर केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकाचे निरीक्षण केले. घोषपथकाच्या तालासुरात एनसीसी, आरएसपी व स्काउट गाईडच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन करून संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. या संचलन पथकांचे नेतृत्व सुज्योत पंडित तर घोष पथकाचे नेतृत्व फातिमा पठाण हिने केले. मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चला चला रे चला या देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करण्यात आले. याबहारदार कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे दिपरतन गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला-गुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळा हे आनंद निर्मितीचे केंद्र असून मुलांनी शालेय जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे असे सांगितले. याप्रसंगी भाषेची अस्मिता जोपसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणाऱ्या स्वालिखित ‘भाषाभगिनी’ या हस्त लिखिताचे प्रकाशन मान्यवरांचे शुभहस्ते झाले. तसेच सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे कोविड लसीच्या निर्मितीत योगदान देणारे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सोमनाथ पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एमकेसीएल मार्फत आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत उज्वल यशस्वी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी एन.सी.सी. विभाग प्रमुख सतीश रणनवरे यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) कामठी, नागपूर येथे 45 दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले त्याबद्दल त्यांचा विद्यालयामार्फत विशेष सत्कार घेण्यात आला.

याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, स्थानिक प्रशाला समितीचे इकबाल काझी, पालक संघांचे सदस्य, पत्रकार, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, माजी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, विनायक रनवरे, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक-शिक्षकेत्तर, विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील, पोपट पवार, दादा साठे यांनी केले. शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमांची सांगता झाली.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button