प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी अनिवार्य; या राज्यात मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
प्रेमविवाहांसाठी विशेष तरतुदी करण्याचा विचार
गेल्या काही दिवसांपासून प्रेमविवाहांमुळे अनेक गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यानंतर आता गुजरातमध्ये (Gujarat) प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी घेण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. अशातच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी प्रेमविवाहाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर घटनात्मकदृष्ट्या हे शक्य असेल तर आमचं सरकार (gujarat govt) प्रेमविवाहांसाठी पालकांची संमती अनिवार्य करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करेल, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे.
पाटीदार समाजाच्या एका वर्गाने प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, आमचे सरकार प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची तरतूद घटनात्मक मर्यादेत करता येईल का याचा अभ्यास करेल.
पाटीदार समाजातील काही घटकांनी प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याच्या मागणीला उत्तर देताना पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, गुजरातचे प्रसिद्ध लेखक जय वसावडा यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही मागणी करणाऱ्यांना तालिबानचे अनुकरण करणारे म्हटले आहे. ‘सरकारला माहीत नाही, पण अशा मागण्या करणारे तालिबानचे अनुकरण करणारे आहेत. अशी मूर्खपणाची आणि हास्यास्पद संकुचित वृत्ती भारतात पूर्वी नव्हती,’ असे जय वसावडा यांनी म्हटलं आहे.
‘प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्यासाठी अभ्यास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारने असे विधेयक आणल्यास मी त्याला पाठिंबा देईन,’ असे काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांनी म्हटलं आहे. प्रेमविवाह करताना पालकांचे दुर्लक्ष होत असताना, सरकार प्रेमविवाहांसाठी विशेष तरतुदी करण्याचा विचार करत आहे, ज्या घटनात्मक असाव्यात, असेही खेडावाला म्हणाले.