मामासाहेब हे वागणं बरं नव्हं पाठपुरावा करा पण संपूर्ण श्रेय घेऊ नका पाटील गटा कडून आमदार संजय मामा शिंदे गटाला मार्मिक टोला.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मामासाहेब हे वागणं बरं नव्ह, पाठपुरावा करा पण संपूर्ण श्रेय घेऊ नका असा मार्मिक टोला माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आमदार संजयमामा शिंदे यांना लगावण्यात आला. करमाळा तालुक्यातील विकासकामे ही नेहमीच श्रेयवादाच्या भोवर्यात गुंतलेली असतात.
गौंडरे ता. करमाळा येथे 132/33 केव्हीए सबस्टेशनच्या सर्वेक्षणाचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असल्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. यावर सदर कामाची मागणी ही सन 2016 मध्ये तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी केली असल्याचा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. याबाबत सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की सन 2014 ते 2019 या कालावधीत करमाळा तालुक्यातील वीजेच्या पायाभूत सुविधांची पुर्तता करण्यात यावी
म्हणून तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी महावितरणचे मुख्यालयात कार्यकारी संचालक (वितरण) म्हणून कार्यरत असलेले श्री संजय ताकसांडे यांना करमाळा मतदार संघात निमंत्रित केले. त्यावेळी श्री ताकसांडे यांचेकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसह पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती.
करमाळा येथे पार पडलेल्या बैठकीत नारायण पाटील यांनी मतदार संघातील गरजेच्या भागात 33/11 केव्ही क्षमतेच्या उपवीजकेंद्राची, गौंडरे ता करमाळा येथे 132/33 केव्हीए क्षमतेचे आणखी एक वीजकेंद्र तसेच वीज वाहक लाईन्स, फिडर, ट्रान्सफॉर्मर, कामगार भरती आदि सर्व बाबींवर एक नियोजित आराखडा संचालक श्री ताकसांडे यांच्या कडे सादर केला होता. त्यावेळी इन्फा 1 ऐवजी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ही नव्या रुपात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी मागणी केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला.
यानूसार मग पुढे कामे होत राहिली. या कामांमध्ये गौंडरे येथील वीजकेंद्राचाही समावेश आहे. करमाळा येथील श्री ताकसांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीचे प्रोसिडींग अर्थात अहवाल महावितरणच्या बारामती विभाग कार्यालयातही उपलब्ध आहे. यामुळे मग आता माजी आमदार नारायण पाटील यांनी मागणी केलेल्या अथवा प्रस्तावित केलेल्या कामांना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने पुढील सर्वेक्षणाचे आदेश दिले असतील तर विद्यमान आमदार महोदयांनी या कामाचा पाठपुरावा जरुर करावा.
परंतू मी नव्याने हे काम सुचवले आहे आणि यापुर्वी या कामाची कल्पनाही मागील लोकप्रतिनिधींच्या डोक्यात आली नाही असा गैरसमज निर्माण करु नये. सन 2014 ते 2019 दरम्यान करमाळा मतदार संघात वीजेची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. महत्त्वाचे म्हणजे अनेक कामे त्याकाळातच प्रस्तावित सुद्धा झाली आहेत. सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी या नात्याने या कामांचा पाठपुरावा जरुर करावा. गौंडरे ता करमाळा येथील 132/33 केव्ही क्षमतेच्या वीजकेंद्रासह अनेक प्रस्तावित कामे आहेत.महावितरणचे बार्शी सारखेच उपविभागीय कार्यालय जेऊर ता करमाळा येथे निर्माण झाले पाहिजे,
जेऊर ता करमाळा येथे ट्रान्सफॉर्मर भवन कार्यान्वित झाले पाहिजे ही महत्त्वाची कामे माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रस्तावित केली आहेत. पण सन 2019 नंतर हि कामे रखडली असल्याची खंत तळेकर यांनी व्यक्त केली. तसेच अगदी काल परवा शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करणारे आमदार संजयमामा शिंदे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे वीजेच्या कामाचा पत्रव्यवहार केल्याची माहिती देत असल्याने आश्चर्य वाटले असा टोलाही प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला.



