विहिरीसाठी मागितली लाच, सरपंचाने उधळले २ लाख; फुलंब्री पंचायत समितीसमोरील प्रकार

टाइम्स 9 मराठी न्यूज
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयांची उधळण केली. गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल अडकवून आलेल्या या सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आंदोलन केले.
सरपंचाचे म्हणणे काय?
सरपंच मंगेश साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. म्हणून शुक्रवारी २ लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या नोटा उधळल्या.
सरपंचाविरोधात गुन्हा दाखल
गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सरपंच साबळे यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे सीईओ विकास मीणा यांनी पञकारांना सांगितले.
सरपंच साबळे यांनी दोन दिवसांपूर्वीच काही प्रस्ताव दाखल केले आहेत. ते प्रस्ताव मंजूर करण्याकरिता त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे
- फुलंब्री च्या गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सांगितले