महाराष्ट्र

​अकलूज नगरपरिषदेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ जाहीर; शास्तीमध्ये मिळणार मोठी सूट

Times 9 Marathi News Network

​अकलूज:अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मालमत्ता करावरील थकित शास्ती (दंड) माफ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार नगरपरिषदेने ‘अभय योजना’ लागू केली आहे. ज्या नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दंडाच्या रकमेत सवलत मिळवून आपला कर भरण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

​महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार, मालमत्ता कराच्या थकित रकमेवर दरमहा २% शास्ती आकारली जाते. यामुळे थकबाकीचा डोंगर वाढत जातो. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने १९ मे २०२५ रोजी ही प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

​सवलतीची मर्यादा: ही योजना फक्त १९ मे २०२५ पर्यंतच्या थकित शास्तीसाठीच लागू असेल. त्यांनतरच्या थकबाकीवरील शास्तीस ही सवलत मिळणार नाही.

​मुदत: या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांना शास्ती वगळता इतर संपूर्ण मूळ थकबाकी ३१ मार्च २०२६ पूर्वी भरणे अनिवार्य आहे.

​अर्ज प्रक्रिया: लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून अधिकृत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

​एकवेळची संधी: ही अभय योजना फक्त एकदाच लागू करण्यात आली आहे.

​योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे:

१. आधार कार्ड.

२. मालमत्ता कराचे मागणी बिल.

३. संपूर्ण मूळ कर भरल्याची पावती.

​प्रशासनाचे आवाहन

​नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ३१ मार्च २०२६ ची वाट न पाहता त्वरित मालमत्ता कराचा भरणा करावा आणि शास्ती माफीच्या या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाशी किंवा (०२१८५) २२२०३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button