यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.दोन आरोपीसह ४ लाख ८२ हजार रुपयाच्या बनावट नोटा केल्या जप्त

प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
पुसद-वाशिम रोडवरील मारवाडी फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी एका स्कूटर चालकाच्या बॅगेची झडती घेतली असता,त्यामध्ये ५०० रुपयांच्या चार लाख ८२ हजार रुपयाच्या ९६४ बनावट नोटा सापडल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली असून, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सविस्तर वृत असे की पुसद येथील एक इसम खऱ्या नोटांच्या मोबदल्यात ५०० रुपयांच्या पाचपट नोटा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.१ जूनच्या रात्री संबंधित व्यक्ती वाशिम येथून मारवाडी फाटामार्गे पुसद येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. या वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी वाहन थांबवून तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी (एमएच २९, बीवाय ८६३७) क्रमांकाच्या मोपेडवरून एक व्यक्ती आला. पथकाने त्याला थांबवून त्याचे नाव विचारले असता,त्याने विशाल नागोराव पवार वय वर्ष ३४, रा. खामनवाडी,पोस्ट कासोळा,ता.महागाव,ह.मुधनराज फर्निचर,गांधीनगर, पुसद असे सांगितले.

या व्यक्तीची तसेच त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता,त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळुन आल्या.पथकाने त्यास ताब्यात घेऊन,तो भाड्याने राहत असलेल्या घराची झडती घेतली असता घरात ५०० रुपयांच्या ९६४ बनावट नोटा आढळून आल्या.पथकाने विशालकडील मोपेडही जप्त केली असून.या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४८९ (ब) (क), १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.

या दरम्यान,पोलिसांनी विनोद गंगाराम राठोड वय वर्ष ४२,रा. सुभाष वाॅर्ड, पुसद आणि बालू बाबूराव कांबळे वय वर्ष ४६,रा.परळी वैजनाथ,जि.बीड या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडे या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे.ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी,सहायक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे,पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर,पोलिस हवालदार सुभाष जाधव,कुणाल मुंडोकार,सोहेल मिर्झा,मोहम्मद ताज,सुनील पंडागळे,दिगंबर गीते आदींच्या पथकाने केली आहे.




