महाराष्ट्र

हजरत” इमाम हुसेन “यांच्या स्मृती प्रित्यर्थ –मोहरम निमित्त..हजरत इमाम हुसेन यांचे बलिदान आज ही प्रेरणादायी—-अतिक अहेमद

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.——- 97 30 867 448

मोहरम आपल्याकडे मोठ्या स्वरूपात साजरा केले जातो. शहरात ही पद्धत कशी रूढ झाली, केव्हापासून झाली यात लक्ष न घालता आपण या ऐतिहासिक घटनेतून नेमका संदेश घेण्याचा प्रयत्न करूया, तर चला मग इतिहासात!

दरवर्षी आम्ही “इमाम हुसेन” (रजी .)यांच्या बलिदान स्मृतिप्रीत्यर्थ दुःख प्रकट करीत असतो. दुर्दैवाने खूप कमी लोक त्यांच्या बलिदानाचा हेतू समजून घेतात . “इमाम हुसेन “( रजी.) यांचे हौतात्म्य आज साडे चौदाशे वर्षानंतरही प्रेरक आहे. इस्लाम निर्देशित राज्य व्यवस्थेत मार्गदर्शक तत्वानुसारच नियुक्त्या व्हाव्यात, त्यात घराणेशाही , राजेशाही यांचा चंचू प्रवेश झालाच तर सम्पूर्ण राज्य व्यवस्था भरकटली जाईल. ते प्रयत्न रोखण्यासाठी इमाम हुसेन( रजी.) यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबियांचे बलिदान दिले. त्या सर्वांचे हे बलिदान एका महान उद्देशासाठी होते. तो उद्देश त्यांना आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय होता.

आता आपण पाहू की त्यांचा तो महान उद्देश काय होता?
हजरत “इमाम हुसेन ” ( रजी.) पैगंम्बर मुहम्मद( स) यांचे नातू होत. त्यांचे खानदान अत्यंत पुण्यवान, चारित्र्यवान होते. राज्य व्यवस्थेबाबत मूलभूत तत्वांचा त्यांना ज्ञान होते. स्वतःसाठी कुठल्याही पदाकरिता ते समाजात असे अकारण रक्तपात घडविण्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. त्यांनी ‘ ” खुल्फा ए राशिदीन ” यांच्या “खिलाफत” राजसत्तेचा अनुभव घेतला होता. खिलाफत च्या कायद्यांचा, ध्येय धोरणांचा अभ्यास त्यांचा होता. अल्लाह च्या भूमीवर अल्लाहचे कायदे या तत्वावर खिलाफत चाले. यातील कायदे, धोरणे यात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नव्हता. राज्य कारभारी हा स्वतः पापभिरू, ईशभिरु असावा आणि तो जनतेच्या अधिकाराबाबत, जनतेच्या सेवेबाबत अल्लाहच्या दरबारात तो जबाबदार असे तत्व इस्लामी सत्तेची होती.

तर मग “इमाम हुसेन ” (रजी.) यांना हौतात्म्य का पत्करावे लागले हे आपण पाहू. तत्कालीन परिस्थितीत कुणी धर्म बदलला नव्हता किंवा राज्यकर्ते ही धर्मविमुख झाले नव्हते. राजसत्तेची मार्गदर्शक तत्वे आणि कायदेही तेच होते . न्याय व्यवस्थेत कुराण आणि सुन्नत प्रमाणेच निर्णय बनी उमैय्या यांच्या काळात होत होते. वादाचा मुद्दा हा होता की राज्याची सर्व सूत्रे( वली अहदी) धर्मबाह्य पद्धतीने यजीद कडे सोपवली जात होती. यातून इस्लामी राजव्यवस्थेचा पाया , संविधान आणि कारभाराची पद्धत बदलणार होती. हाच धोका आणि त्याचे परिणाम ” “इमाम हुसेन “(रजी.) यांनी ओळखून आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांनी त्यावेळी जे ओळखले ते आपण मध्ययुगीन इतिहासात साम्राज्यवादी सत्ता पहिल्याच आहेत .

शक्तीशाली मोगल राजांनी अनेक ठिकाणी आक्रमणे करून आपली सत्ता स्थापली. ते स्वतः बादशाह बनले. धर्माने मुस्लिम होते तरी त्यांच्या राज्यकारभारात इस्लामी तत्वे किंवा खिलाफतचे अंश कुठेही नव्हते. असो, हे असे होईल, खिलाफत सम्पूष्टात येईल आणि राजे , महाराजे, बादशाहचें राज्य उदयास येतील हा भविष्यातील धोका ” इमाम हुसेन ” ( रजी.) यांनी तत्कालीन परिस्थितीत ओळखला होता. या धोक्यात इस्लामी व्यवस्था वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत हौतात्म्य पत्करले.

आता आपण खिलाफत आणि बादशाहत यातील फरक समजून घेऊ या.

खिलाफत म्हणजे अशी व्यवस्था ज्यात सर्व राज्य कारभार कुराण व सुन्नत च्या आधारे चाले. यात समाविष्ट ठळक वैशिष्ट्य हे होत की, राज्यकर्ते जनतेमध्ये सत्कर्म आणि पुण्यकार्य वाढीस लावतील, ज्या गोष्टी निषिद्ध आहेत, अल्लाह ला अप्रिय आहेत त्यांचे उच्चाटन करतील. तसेच खिलाफतच्या मूलभूत तत्वात मुक्त निवडणुका आणि मतदानाचे अधिकार, मत स्वातंत्र्य , सल्लागार मंडळाच्या सल्याने , सर्व संमतीने उच्च चारित्र्यवान व्यक्ती निवडून राज्याची सूत्र त्याच्या हवाली करण्याची पद्धत होती. तसेच या प्रक्रियेत “बैत” ‘ ला खूप महत्व असे . बैत म्हणजे ज्याला खलिफा म्हणून स्वीकारले त्या सोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ. याचं देखील लोकांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. यात कुणीही बळजबरी अथवा षडयंत्र करून लोकांशी बैत घेऊ शकत नव्हता. जो पर्यंत एखाद्याला बैत रुपी जनसमर्थन मिळत नाही तो पर्यंत त्याच्या हातात सत्ता देऊ नये हा नियम होता. खुल्फा ए राशिदीन याच तत्वावर सत्तेत आले होते. . तर आमिर मुआविया(रजी.) यांच्या बैत बाबत शंका उपस्थित झाल्याने त्यांना” खुल्फा ए राशिदीन “मध्ये स्थान मिळू शकले नाही, ते पैगंम्बर मुहम्मद(स) यांचे जवळचे साथीदार( सहाबी) होते तरीही !

इस्लामी राज्यव्यवस्थेचे दुसरे महत्वपूर्ण तत्व म्हणजे ‘ शुराई निजाम’ अर्थात सल्लागार मंडळाची व्यवस्था. राज्यकारभार त्या लोकांच्या सल्याने केला जावा जे ज्ञानी व पुण्यवान आहेत, ज्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. “खुल्फा ए राशिदीन ” यांच्या काळात ही सल्लागार मंडळे नियुक्त केले जात. त्यांची निवड निवडणुकी मार्फत होत नसे. ही मंडळी वेळो वेळी राज्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देत असे. हजरत मुआविया (रजी .)यांनी आपला पुत्र– यजीद– ची वली अहदी करून शुराई निजाम सम्पूष्टात आणले. त्यांच्या दरबारात गव्हर्नर आणि सुभेदार सल्लागार मंडळात आले आणि इस्लामी तत्वांच्या विरोधात निर्णय प्रक्रिया होऊ लागली.

इस्लामी राज्य व्यवस्थेचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जनता मुक्त पणे आपले मत व्यक्त करू शकत होती. सामान्य व्यक्ती देखील खलीफाला प्रश्न विचारू शकत होती. राज्यसत्ता तेव्हाच चालू शकते जेव्हा लोकांना बोलण्याचा अधिकार असेल.

इस्लामी राज्यव्यवस्थेत चौथे महत्वाचे तत्व आहे उत्तरदायित्व!
खलिफा म्हणजे राज्यप्रमुख हा त्याच्या निर्णय आणि कृतीबाबत अल्लाह समोर आणि प्रजेसमोर प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला तो जबाबदार असेल. बादशाही व्यवस्थेत राजे, बादशाह उन्मुक्त वागतात, त्यांच्या ठायी इशभय नसते त्यातून कुव्यवस्था निर्माण होत गेली आपण हे पहिलेच आहे.

इस्लामी राज्य व्यवस्थेतील पाचवे तत्व म्हणजे ‘ बैतुल माल’ व्यवस्था. यात जे काही उत्पन्न राजकोषात जमा होईल ते जन कल्याणासाठी खलिफा खर्च करेल. त्याला पै न पै चा हिशोब द्यावा लागे. राजेशाही अथवा बादशाहत मध्ये राजकोशातील निधी हा वैयक्तिक राजाचा असे.

इस्लामी राज व्यवस्थेत सहावे महत्वाचे तत्व म्हणजे. शरियत नुसार कायद्याचे राज्य! सर्व विषय कायद्यांच्या अधीन राहूनच निर्णय घेतले जात. कायद्यापुढे सगळे समान, कुठलाही भेद भाव नाही. राजेशाहीत किंवा बादशाहत मध्ये कायद्याची अमलबजावणी राजाच्या मर्जीवर अवलंबून असे.

इस्लामी राज्य व्यवस्थेत सातवे तत्व आहे, समान हक्क आणि अधिकारांचे.यात सर्व सामान्य जनतेला एकसमान हक्क आणि अधिकार दिलेले दिसून येतात. तर राजेशाही आणि बादशाहत मध्ये सर्व सामन्यांना या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवले गेले हे आपण इतिहासात पहिलेच आहे.

तुलनात्मक फरक आपणास कळलाच असेल, इस्लामी खिलाफत आणि बादशाहत मध्ये मोठा फरक आहे. विचार करा जर करबलाचा प्रसंग इस्लामी इतिहासात घडलाच नसता तर तत्कालीन इस्लामी राज्य व्यवस्थेचा किती विस्तार झाला असता. जगाचा इतिहास आणि भूगोल वेगळाच असता. परंतु त्या एक करबलाच्या घटनेने इस्लामी राज्य व्यवस्थेच्या विस्तारात आडकाठी आणली हे एक कटू सत्य आहे. खिलाफत सम्पूष्टात येऊ नये व राज्य व्यवस्था बादशाहत मध्ये परावर्तित होऊ नये, अल्लाह च्या भूमीवर अल्लाहचेच कायदे अंमलात यावेत या साठी ” इमाम हुसेन ” ( रजी) यांनी तत्कालीन राज्यकर्त्या विरोधात एल्गार पुकारला. धर्म आणि त्याच्या तत्वांच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या प्राणांची आहुती दिली. धर्मात राज्यप्रमुख निवडीचे मार्गदर्शन असताना ते डावलून नवीनच प्रकार यजीद करीत होते. ते एक प्रकारे ‘ धर्म बाह्य ‘ गोष्टींचा पायंडा घालत होते.

अशा धर्म बाह्य गोष्टींना वेळीच रोखणे हे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य आहे. जरी त्यासाठी प्राणांची बाजी लावावी लागली तरी! येथे एक विशेष बाब नमूद करावीशी वाटते. पैगंम्बर मुहम्मद (स.) यांनी एकदा करबला मैदानात भेट दिली असता त्यांनी आपल्या सहाबी यांना करबला भूमीवर एक जागा दाखवून भाकीत केलं होते की, याच युद्ध भूमीत त्यांचे नातू इमाम हुसेन(र जी.) शहीद होतील म्हणून. उल्लेखनीय बाब म्हणजे पैगंम्बरांचे हे भाकीत ठाऊक असून ही धर्मरक्षणार्थ ” इमाम हुसेन ( रजी .) मृत्यूची तमा न बाळगता लढले . त्यांचा जागी दुसरा कुणी असता तर युद्धातून माघार घेऊन सुरक्षित झाला असता. परंतु “इमाम हुसेन” (रजी.) यांचे ध्येय मोठे होते. त्यांना आपल्या धर्माची तत्त्वे महत्वाची होती, त्याची रक्षा आणि इस्लामी राज्य व्यवस्थेची मूल्य अबाधित ठेवायची होती. हा प्रेरक संदेश आपण “इमाम हुसेन “( रजी.) यांच्या हौतात्म्यातून घ्यावा एव्हढेच अपेक्षित!

लेखक ;– अतिक अहमद
अहमदनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button