हॅकेथॉन स्पर्धेत मुंडफणेवाडी शाळेचे यश

प्रतिनिधी – रियाज मुलाणी
मो.9921500780
कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील मुंडफणेवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील ४८०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 30 विद्यार्थी व 10 शिक्षकांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडफणेवाडीच्या श्रावणी चव्हाण, समर्थ चव्हाण व सोनाक्षी सावंत या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांनी ऊस तोडणी कामगार मुलांच्या शिक्षणाची समस्या हा गेम बनवला होता. वर्गशिक्षक समीर लोणकर व अर्चना वाघ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी शाळेला दोन टॅब ॲलेक्सा इको डॉट, कॉम्प्युटर कोडींग पुस्तके, सर्टिफिकेट आणि मेडल ही बक्षीस प्रदान करण्यात आली. माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार करडे, विस्तार अधिकारी सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख भक्ती नाचणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.