पालघर जिल्ह्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय सुरू करण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी घेतली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
पालघर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालय आणि शासकीय मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयात भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर विनायक काशिद देखील उपस्थित होते.
यावेळी पालघर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रे आणि कृषी क्षेत्रातील नवनविनकल्पना विकसित करण्यावर विशेष भर देणे तसेच वसईची प्रसिद्ध केळी, जुनी लाल केळी, सफेद वेलची, आणि मोगरा यांसारख्या पिकांसाठी विशेष संशोधन व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यावर चर्चा झाली.

शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठामार्फत पालघर जिल्ह्यात कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शन शिबिरे राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल आणि तरुण मुलांना शेती विषयक व मत्स्य शेती विषयावर चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन शेती क्षेत्रात नक्कीच प्रगती करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत पालघर जिल्ह्याच्या एकूण कृषी व मत्स्य शेती व्यवसायाच्या विकासासाठी रचनात्मक उपाययोजना राबवण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. लवकरच या विषयावर पुढील पावले उचलण्यात येणार असून जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.