“बंद सम्राट” जॉर्ज फर्नांडिस यांच्या स्मृती दिना निमित्त…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा आज २९ जानेवारी हा स्मृतिदिवस.राज्यसभेमध्ये 2009 ते 2010 या काळात त्यांनी शेवटचं सदस्यत्व भूषवलं होतं.अटलबिहारी वाजपेयी यांच्या NDA सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते…
फर्नांडिस आणि बंद हे नातं इतकं अतूट होतं की त्यांना ‘बंद सम्राट’ असंच म्हटलं जायचं आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस महत्त्वाचे नेते म्हणून पुढं आले होते.समाजवादी विचारांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
आणीबाणीनंतर त्यांनी मी सतत विरोधात राहणार,अशी भूमिका मांडली होती.आणीबाणीच्या काळात बडोदा इथं एका स्फोटासंदर्भात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला होता.ते जनता सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री होते.तर उद्योगमंत्री म्हणून त्यांनी कोकाकोला आणि आयबीएम या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
1994ला त्यांनी समता पक्षाची स्थापना केली होती. 1998मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये ते सहभागी झाले होते. त्याकाळात त्यांची संकटमोचक म्हणून भूमिका राहिली होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना त्यांनी तिलांजली दिली,अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती.
भारतात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे सर्वसामान्य आणि दुसरे म्हणजे धर्मनिरपेक्ष.मी सर्वसामान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती…
कर्नाटकात धार्मिक कॅथॉलिक कुटुंबात त्यांचा जन्म 1930 साली झाला.त्यांनी धर्मोपदेशक बनावं,अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती,असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.पण ते न पटल्यामुळे ते 1949 साली नोकरीच्या शोधात मुंबईत आले.तेव्हा ते 19 वर्षांचे होते.मुंबईत काम करता करता ते युनियन लीडर्सच्या संपर्कात आले…
त्यांच्यातल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांमुळे ते अल्पावधीत कामगारांचे नेते झाले. “जॉर्ज फर्नांडिस यांचं ‘बंद सम्राट’ असं लोकसत्ताचे पत्रकार अशोक पडबिद्री यांनी वर्णन केलं होतं.मुंबई महापालिका, बेस्ट, हॉटेल वर्कर्स,फेरीवाले यांच्या संघटनेचा ते नेता बनले.त्यांच्या मागण्यांसाठी ते बंद पुकारत,म्हणून त्यांना बंद सम्राट अशी पदवी देण्यात आली होती जॉर्ज यांना कोकणी,तुळू,मराठी,इंग्लिश,हिंदी,कन्नड अशा भाषा येत होत्या.या भाषांमध्ये संवाद साधत भाषणे करत त्यानी सबंध कामगार वर्गाची मने जिंकून घेतली होती…
मुंबई महानगर पालिका युनियन, टॅक्सी चालक युनियन, बेस्ट कामगार युनियन अशा युनियन अशा संघटना त्यांनी स्थापन केल्या.राष्ट्रीय स्तरावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते स. का. पाटील यांचा 1967साली लोकसभा निवडणुकीत पराभव केला…
तेव्हापासून त्यांची ओळख ‘जायंट किलर’ अशी बनली,स.का.पाटील हे तेव्हाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात.’देव सुद्धा मला हरवू शकणार नाही’ हे त्यांचे तेव्हाचे उद्गार प्रसिद्ध आहेत.जॉर्ज फर्नांडिसचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ पत्रकार विक्रम राव याबाबतची एक आठवण सांगतात,”मी स. का. पाटील यांना विचारलं की तुम्ही तर मुंबईचे अनिभिषिक्त सम्राट आहात.पण असं ऐकलं आहे की कोणी नगरसेवक तुमच्या विरोधात निवडणूक लढत आहे. त्याचं नाव जॉर्ज फर्नांडिस आहे.”
“त्यावेळी चिडून स. का. पाटील यांनी म्हटलं की कोण जॉर्ज फर्नांडिस.तो मला कसं हरवू शकणार? देव जरी आला तरी मला कुणी हरवू शकणार नाही.” विक्रम राव सांगतात, “दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांची हेडलाईन हीच होती. पाटील म्हणतात देव आला तरी मला हरवू शकणार नाही.त्यांच्या या हेडलाइनला फर्नांडिस यांनी पोस्टर लावून उत्तर दिलं.
फर्नांडिस यांचं पोस्टर असं होतं की, पाटील म्हणतात मला देव सुद्धा हरवू शकणार नाही, पण तुम्ही (जनता) त्यांना हरवू शकता.” ही मात्रा जनतेला योग्यरीत्या लागू झाली.जॉर्ज फर्नांडिस हे 42 हजार मताधिक्याने निवडून आले.पाटील यांचा अस्त हा जॉर्ज फर्नांडिस यांचा उदय ठरला. जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई महापालिकेचा कारभार मराठीतून चालावा,यासाठी आंदोलन केलं होतं,शिवाय काळाघोडा पुतळा हटवण्याची मागणीही केली होती…
1974 साली जॉर्ज आणि कामगार नेत्यांनी मोठा संप घडवून आणला. 3 मे रोजी कामगारानी मुंबई बंदची घोषणा केली. दोन दिवस मुंबई बंद पडली. 5 मेपासून देशातील रेल्वे कामगार संपावर गेले. देशातील 20 लाख कामगार एकाच दिवशी संपावर गेले. सरकारने 13 लाख कामगारांच्या सेवा खंडित केल्या. 50 हजारहून जास्त कामगार पकडले गेले. वीस दिवस संप झाल्यावर 26मे रोजी जॉर्ज यानी तिहार जेलमधून संप मागे घेतला.1975 ला जेव्हा आणीबाणी घोषित झाली हे त्यांना भुवनेश्वरला असताना कळलं. तिथून ते कारने दिल्लीला आले. तिथून ते बडोद्याला गेले…
दीड महिन्यानंतर ते कलकत्त्याला गेले. तिथंच त्यांना अटक झाली. तिथून त्यांना दिल्लीला आणलं.1977ला ते तुरुंगात होते. 1977 ला ते तुरुंगातच होते. त्याचवेळी निवडणुकांची घोषणा झाली. तुरुंगातूनच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मुझफ्फरपूरहून ते निवडून आले. ते जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री बनले…
पूर्ण राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेसला विरोध केला. स्वतः डाव्या विचारांचे असूनही त्यांनी उजव्या विचारांच्या भाजपसोबत हातमिळवणी केली.वाजपेयींच्या मंत्रिमंडळात पुढे ते संरक्षण मंत्री झाले.तहलका या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागला होता. फर्नांडिस यांच्या समता पार्टीच्या अध्यक्ष जया जेटली या स्टिंग ऑपरेशनमध्ये कथित शस्त्रास्त्र दलालांशी बोलताना दिसल्या होत्या. अखेरच्या काळात फर्नांडिस अल्झायमर आणि पार्किन्सन्स या आजारांनी ग्रस्त असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांनी दिल्या होत्या.या काळात ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. अखेरीस 29 जानेवारी 2019 ला या वादळी व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला…