शहर

प्रतीक पाटील या बनावट IAS अधिकाऱ्याकडून कोट्यवधींचा घोटाळा…. सफाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी केला गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

डेप्युटी कलेक्टर (IAS) असल्याचा बनाव करीत खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींच्या जमीनींचा घोटाळा करणाऱ्या प्रतिक मोहन पाटील (रा. मधुबन सोसायटी,सफाळे. जिल्हा पालघर.) याला सफाळे येथील मंडळ अधिकारी तेजल पाटील यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये राज्यसेवा परीक्षा देवून त्यात उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर (IAS) झाल्याचे भासवून प्रतिक पाटील हा सफाळे परिसरात राहत होता. दरम्यान, सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील कर्दळपाडा भागात पालघर येथील जयंत विष्णू दांडेकर यांची 15 एकर आणि आशालता दत्तात्रय ताम्हणकर या मयत महिलेची साडेपाच गुंठे मालकीची जमीन आहे. या दोन्ही जमिनींसाठी बनावट आधारकार्ड आणि पैनकार्ड यांच्या साहाय्याने प्रतीक पाटील यांनी खोटे दस्तावेज बनवून ११ एप्रिल 2025 रोजी तपासणी करण्यासाठी सफाळे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पाठविले. तसेच आपण (IAS ) अधिकारी असून कलेक्टर गोविंद बोडके यांच्या मुलाचे बॅचमेट असल्याचे त्याने मंडळ अधिकारी तेजल पाटील यांना सांगितले.

तलाठी अजित घरत यांनी दस्तावेजची दफ्तरी नोंद केल्यावर काहीच दिवसांनी तेजल पाटील यांना कागदपत्रे तपासतांना जमिनीसंदर्भातील खरेदी दस्तवेज व भाडेपट्टा करारात खोट्या सह्या व बनावट आधारकार्डाचा वापर केला असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून सफाळे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सफाळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी प्रतीक पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रतीक पाटील यास शुक्रवार 9 मे 2025 रोजी पालघर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याच्याविरोधात अधिकाधिक पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या असून पुढील तपास सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button