रतन टाटा यांना कंदीलातून भावपूर्ण आदरांजली – गणाई परिवाराची फटाके मुक्त दिवाळी साजरी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक
7030516640
उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा यांचे निधन प्रत्येकासाठी दु:खदायक क्षण ठरले. त्यांच्या कर्तृत्वामुळे देशाला भरघोस योगदान मिळाले असून त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देत यंदाच्या दिवाळीत गणाई परिवाराने फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे .
प्रत्येक वर्षी दिवाळीत नवीन संकल्पना घेऊन कंदील बनवणाऱ्या गणाई परिवाराने यंदा रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खास कंदील तयार केला. गणाई परिवारातील सुनीता सुतार यांच्या सूचनेवरून रतन टाटा यांच्या जीवनाचे प्रतीक म्हणून एक विशेष कंदील तयार करण्याची कल्पना आली. त्यानंतर सचिन सुतार यांनी कंदीलाचे स्केच तयार केले, तर राकेश सुतार यांनी त्याची संकल्पना मनात बांधली.
रतन टाटा यांचे कार्यशील जीवन आणि समाजातील योगदानाची झलक दाखवण्यासाठी कंदीलात त्यांची प्रख्यात ‘नॅनो’ कार, ताज हॉटेल आणि त्यांच्या जीवनाची उंच भरारी दाखवणारे विमान या प्रतिकांचा समावेश करण्यात आला. या कलेतून त्यांच्या दानशीलतेला आणि समाजसेवेला अभिवादन करण्यात आले.
गणाई परिवाराने गेल्या १३ वर्षांपासून फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची परंपरा जोपासली आहे. यंदा त्यांनी रतन टाटा यांना आदरांजली अर्पण करून फटाके मुक्त दिवाळी साजरी केली. “रतन टाटा यांच्यासारखा देव माणूस पुन्हा होणे नाही,” असे भावनिक उद्गार गणाई परिवाराने काढले.
गणाई परिवाराच्या या कृतज्ञतेच्या भावनेला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, दिवाळीच्या या आदर्श पद्धतीचे कौतुक सर्वत्र होत आहे.