वर्षभरानंतर अखेर काँग्रेसला चिपळूण तालुकाध्यक्ष मिळाला; लियाकत शहा यांची नियुक्ती

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
चिपळूण – 14 जून : काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लोकसभा निवडणुकीनंतर अखेर मुहूर्त सापडला असून चिपळूण शहराध्यक्ष लियाकत शहा यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लियाकत शहा यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या नावाची घोषणा केली. या निवडीचे चिपळुणात जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

तत्कालीन तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदासह पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. मध्यंतरी सुधीर दाभोळकर यांना तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या निवडीला जोरदार विरोध करण्यात आला. कोणालाही विश्वासात न घेता तसेच पक्षांतर्गत प्रक्रिया न राबवता परस्पर नियुक्ती करण्यात आल्याचा थेट आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे दाभोळकर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
याचदरम्यान काँग्रेसचे निरीक्षक चिपळूणमध्ये आले. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर हा विषय मागेच पडला. गेले वर्षभर तालुकाध्यक्षांविनाच चिपळूण काँग्रेसचा कारभार सुरू होता. शहराध्यक्ष म्हणून लियाकत शहा नेतृत्व करत होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यामुळे शहा यांच्याकडे तालुकाध्यक्ष पद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

लोकसभा निवडणूक आटोपल्यावर काँग्रेस नेत्यांनी याकडे लक्ष दिले आणि शहा यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. मुंबई येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शहराध्यक्ष, दोन वेळा नगरसेवक, उपनगराध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.



