पालघर जिल्ह्यातील सफाळे वेढी गावात उभारले जाणार नवीन सबस्टेशन… पालघर तालुकाप्रमुख नचिकेत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील नागरिकांना अनियमित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात ठाकरे गटाचे पालघर तालुका प्रमुख आणि वेढी गावाचे सरपंच नचिकेत पाटील यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये महावितरण पालघरचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता लवकरच वेढी गावात नव्याने सबस्टेशन उभारले जाणार आहे.
याबाबत गुरुवारी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केल्याने सतत पश्चिम भागातील गावात होणाऱ्या विजेच्या लपंडवातून येथील नागरिक मुक्त होणार आहेत.
सफाळे उपविभागातील रामबाग येथील महावितरणच्या सबस्टेशनवर येथील कपासे, ठाकूरपाडा, रामबाग, आगरवाडी, माकुणसार, नगावे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे एडवण दातीवरे ते मांडे, विराथन बुद्रुक,माकणे ते थेट टेंभिखोडावे अशा साधारण 25 ते 30 गावांचा भार असल्यामुळे नवीन सबस्टेशन उपविभागात मंजूर करण्यासाठी सरपंच नचिकेत पाटील यांनी 2 फेब्रुवारी 2024 मध्ये रामबाग सबस्टेशन व्यतिरिक्त आणखी एक सबस्टेशन उभारण्याबाबत अधीक्षक अभियंता दिलीप खांदे यांना लेखी पत्र दिले होते.
19 जुलै 2024 रोजी महावितरणच्या वसई येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी सरपंच नचिकेत पाटील यांना लेखी पत्र देऊन वेढी गावात 33/11 केव्हीचे सबस्टेशन उभारण्यासाठी शासकीय जागा उबलब्ध करुन देणे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि नाहरकत दाखला देण्यासंदर्भात सूचित केले होते. यासर्व बाबींची पूर्तता झाल्याने नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी जागा पाहणीचे निर्देश अधीक्षक अभियंता यांनी दिले होते.
त्यानुसार गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी वेढी गावात जागेची पाहणी करण्यात आली. सदर जागेचे मोजमाप करून प्रस्ताव सादर करून जागा ताब्यात घेणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. यावेळी महावितरण बांधकाम विभागाचे योगेश अहिवाल सफाळे उपविभागीय अभियंता अनिरुद्ध बैतुले, सायली कांबळे, वेडी गावाचे सरपंच नचिकेत पाटील उपस्थित होते.