लोकांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात ‘बंडखोर’ने आणखी प्रखर व्हावे: माजी आमदार रामभाऊ सातपुते’साप्ताहिक बंडखोर’चा १५ वा वर्धापनदिन व धुरंधर पुरस्कार सोहळा अकलूजमध्ये उत्साहात संपन्नविविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘धुरंधर’ पुरस्काराने गौरविले

Times 9 Marathi News Network
अकलूज:”आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून संपादक गौतम भंडारे हे ‘साप्ताहिक बंडखोर’च्या माध्यमातून अत्यंत तळमळीने चळवळीतील प्रश्न मांडून प्रखरपणे व्यक्त होत असतात. त्यांनी आपली धारदार लेखणी लोकांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात चालवून ‘बंडखोर’च्या लेखणीने भविष्यात आणखी प्रखर व्हावे,” असे आवाहन माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केले.
’साप्ताहिक बंडखोर’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त संपादक गौतम भंडारे यांच्या वतीने ‘धुरंधर पुरस्कार सोहळा’ व ‘वर्धापनदिन विशेषांक प्रकाशन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर ‘धुरंधर डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘धुरंधर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

…तर गौतम भंडारे यांनी प्रखर पत्रकारिता करावी: रामभाऊ सातपुते
पुढे बोलताना रामभाऊ सातपुते म्हणाले की, “धुरंधर पुरस्कार सोहळा हे एक माध्यम असले तरी गौतम भंडारे यांच्या मनात समाजसेवकांबद्दल असलेले प्रेम यातून दिसून येते. त्यांनी लेखणीला दिलेली धार कौतुकास्पद आहे. भविष्यात माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रात कुठेही लोकांवर अन्याय-अत्याचार, शोषण किंवा दहशतीचा प्रयत्न झाल्यास, भंडारे यांनी तिथे प्रखरपणे पत्रकारिता करावी.” तसेच पुरस्कारविजेत्यांनी यापुढे अधिक झोकून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बंडखोरच्या पत्रकारितेचे चटके सर्वांनाच बसले: डॉ. एम. के. इनामदार
अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा व सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार म्हणाले की, “संपादक गौतम भंडारे यांनी सलग १५ वर्षे निर्भीडपणे केलेली पत्रकारिता भूषणावह आहे. त्यांच्या पत्रकारितेचे चटके सर्वांनाच बसले, तसे मलाही एक-दोन वेळा बसले. ते या पत्रकारितेत निष्णात झाले असून समाजामध्ये नेहमी चेतना निर्माण करण्याचे काम करत आहेत.”
कोळशातून हिरे शोधण्याचे काम: डॉ. श्रद्धा जवंजाळ
’पिंक रिवोल्युशन’च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या की, “संपादक गौतम भंडारे यांनी खूपच कमी वेळेत माळशिरस तालुक्यातील सामाजिक, अध्यात्मिक, पत्रकारिता, विधी, वैद्यकीय व नर्सिंग क्षेत्रातील पुरस्कार्थींचा शोध घेतला आहे. हे काम अगदी कोळशातून हिरा शोधून काढण्यासारखे आहे.”

गौतम भंडारे हा एक योद्धा: किरण धाईंजे
आरपीआय (आठवले) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे म्हणाले की, “‘धुरंधर’ म्हणजे योद्धा आणि गौतम भंडारे हे सुद्धा एक योद्धाच आहेत. प्रस्थापितांच्या दहशतीनंतरही तालुक्यातून लोक ‘बंडखोर’ पेपर शोधून न्यायचे. मला मिळालेल्या ‘धुरंधर समाजरत्न’ पुरस्कारामुळे भविष्यात अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे.”
कोर्टातील प्रत्येक लढाईत आम्ही सोबत: ॲड. सुमित सावंत
साप्ताहिक बंडखोरचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुमित सावंत म्हणाले की, “कोणत्याही चळवळीला वृत्तपत्राची साथ मिळाल्याशिवाय ती जिवंत राहू शकत नाही. आंबेडकरी चळवळीला ताकद देण्याचे काम ‘बंडखोर’ने केले.गौतम भंडारे यांना दाबण्यासाठी प्रस्थापितांनी कितीही केसेस केल्या, तरी कोर्टातील प्रत्येक लढाईला माझी टीम त्यांच्यासोबत असेल.”
प्रलोभन आणि दबावाला बळी न पडणारा माणूस: श्रीनिवास कदम पाटील
’बारामती झटका’चे संपादक श्रीनिवास कदम पाटील म्हणाले की, “पत्रकारिता करताना अनंत अडचणी येतात, घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते. वास्तव आणि सत्य बातमी अनेकांना खटकते. मात्र, गौतम भंडारे यांनी कधीही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता ताठपणे पत्रकारिता केली, याचा मला अभिमान आहे.”
जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर: सुनिता भालेराव
उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील इन्चार्ज सिस्टर सुनिता भालेराव यांनी पुरस्काराबद्दल आभार मानताना, “आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असून उपजिल्हा रुग्णालयात यापुढेही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून दक्ष राहू,” असे सांगितले.
विविध क्षेत्रातील ‘धुरंधर’ पुरस्कारांचे मानकरी:
धुरंधर वैद्यकीय पुरस्कार डॉ. एम. के. इनामदार
धुरंधर परिचारिका पुरस्कार सौ. सुनिता दिगंबर भालेराव
धुरंधर समाजरत्न पुरस्कार किरण (तात्या) विठ्ठल धाईंजे, जगन्नाथ शिंदे, सुनील बाजी साळवे, नाशिक (आबा) विठ्ठल सोनवणे, विनायक अंकुश सुर्वे, महेश केशव शिंदे, प्राचार्य गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ
धुरंधर कायदारत्न पुरस्कार ॲड. सुमित राजू सावंत
धुरंधर शिक्षकरत्न पुरस्कार मुख्याध्यापक प्रविण वसंत लोंढे, डॉ. शशिकांत कुलकर्णी
धुरंधर पत्रकार पुरस्कार ज्योती गायकवाड (लोंढे), श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील
धुरंधर कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर (ओवाळ)
धुरंधर कलाकार पुरस्कार उमेश शिंदे
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संपादक गौतम भंडारे यांच्यासह उपसंपादक ज्योती गायकवाड, कार्यकारी संपादक राजरत्न गौतम भंडारे, ‘बारामती झटका’चे संपादक श्रीनिवास कदम पाटील, वृत्तसंपादक प्रविण लोंढे आणि सारंग मोकाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



