सफाळे आगारात दाखल झालेल्या नवीन लालपरी बसेसचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते उद्घाटन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे एस.टी. आगारात नव्याने दाखल झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बसेसचे उद्घाटन आमदार विलास तरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 28 जून रोजी सफाळे एसटी आगारात उत्साहात पार पडले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, प्रवासी, ग्रामस्थ व एस.टी. मंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार विलास तरे यांनी सांगितले की”परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आपले मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पालघर जिल्ह्यातील विविध मागण्या वेळोवेळी मांडत आलो असून त्या सकारात्मकपणे मार्गी लागत आहेत. सफाळे आगारात नव्याने मिळालेल्या या बसेसचा लाभ प्रामुख्याने आदिवासी भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, उदरनिर्वाहासाठी येणारे – जाणारे चाकरमानी, वयोवृद्ध नागरिक, महिला भगिनी यांना होणार आहे. या माध्यमातून त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर व वेळबद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.”
आमदार तरे पुढे म्हणाले की, “गेल्या अधिवेशनामध्ये मी आपल्या पालघर जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या बसेस कमी असल्याबाबत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. भविष्यातही जिल्ह्यातील एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.” तसेच, गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी जाते असे महामंडळाचे कार्य आहे, असे आमदार विलास तरे म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्यावेळी आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा यंत्र अभियंता निलेश धारगावे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्ना म्हात्रे, उपसरपंच माकणे तनुजा घरत, भरत काळे, समीर म्हात्रे, अजित पाटील, साहिल पाटील, महेंद्र पाटील, सुरज साळुंखे, स्थानिक जनप्रतिनिधी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



