पिंपरी बुद्रुक येथील दारूसह अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव आवाजी मतदानाने ग्रामसभेत मंजूर

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील दारूसह अवैध व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव आवाजी मतदानाने ग्रामसभेने मंजूर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ ज्योती श्रीकांत बोडके होत्या. सभेचे कामकाज ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी पार पाडले.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतची ग्रामसभा विठ्ठल रूक्मिणी मंदिरात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सौ ज्योती श्रीकांत बोडके उपस्थित होत्या. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, सुदर्शन बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, विद्या बोडके, भाग्यश्री बोडके, रतन सुतार, सुनिता शेंडगे, पुनम बोडके, अविंदा बोडके, संध्या बोडके, वर्षा बोडके, राजश्री साबळे, सारिका वाघमारे, युवराज गायकवाड, अण्णा पाटील, चक्रधर सूर्यवंशी आदिंसह महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी गावात अवैद्य पध्दतीने दारूची विक्री केली जाते. त्यामुळे गावातील तरूणांसह नागरिकांना दारूची वाईट सवय लागली. यातून अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतने गावातील दारूसह अवैद्य व्यवसाय बंद करण्याचा ठराव मांडताच आवाजी मतदानाने हात वरती करून मंजूर केला.
ग्रामसभेला गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून दारूबंदी कायमस्वरूपी करण्यासाठी गावातील प्रमुख गाव कारभाऱ्यांना गळ घातली. जर ठराव करूनही गावात दारूची विक्री सुरू राहीली तर मात्र आगामी काळात गावातील महीलांना कायदा हातात घ्यावा लागेल. यातून होणाऱ्या परीणामांना गाव कारभारी, महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार राहतील असे उपस्थित महिलांतून प्रतिक्रिया देण्यात आल्या.
चौकट – पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने यापुर्वीही अशाच पद्धतीने दारूबंदीचा ठराव मंजूर करून पोलीस प्रशासन, महसूल व पंचायत समिती यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र यावर कार्यवाही होण्याऐवजी ठराव थंड बासणात गुंडाळून ठेवण्यात आला. याला जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी महिला व नागरीकांनी केली आहे.



