विद्यार्थ्यांनो ताणतणाव न घेता परीक्षा द्या – केंद्रप्रमुख अमोल फुले
अकलूज प्रतिनिधी – तात्यासाहेब काटकर
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला आज शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ पासून सुरूवात होत असून, सदर परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यात १८२ केंद्रावर ६५७४९ विद्यार्थी व या वर्षीच्या बोर्डाच्या नवीन सरमिसळ पद्धतीने सदाशिवराव माने विद्यालयात (केंद्र ३१२०) मध्ये ५५० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी केंद्रावर हजर राहायचे आहे. तर, मंडळाने विद्यार्थ्यांना शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे मिळणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्या असे आवाहन मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अमोल फुले यांनी केले.
परीक्षा केंद्रांवर शांतता आणि सुरक्षा राहण्याबाबत काळजी घेतली आहे. कॉपी प्रकरणे थांबविण्यासाठी केंद्रावर बैठे पथक उपलब्ध राहणार आहे. परीक्षा केंद्रावर अनोळखी व्यक्ती घुसून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पथकांमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. काॅपी प्रकार आढळल्यास शाळेवरती कार्यवाही होणार असल्याने काॅपी मुक्त परीक्षेवरती भर देण्यात आला आहे.
अशी माहिती उपकेंद्रप्रमुख दत्तात्रय घंटे यांनी दिली. सर्वप्रथम सव्वा दहा वाजता विद्यालयात विद्यार्थ्यांना तपासून स्थानिक प्रशाला समितीचे सदस्य मनोज रेळेकर, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे व परीक्षा प्रमुख उमेश बोरावके, राजन चिंचकर, धनंजय मगर, राजकुमार पाटील व शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व पेढे देऊन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक देण्यात आले.