तांदुळवाडी विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश….
अकलूज प्रतिनिधी – तात्यासाहेब काटकर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे गेल्या डिसेंबरमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी निश्चित केलेल्या कोट्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तांदुळवाडी तालुका माळशिरस येथील माध्यमिक विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची प्रज्ञा जोपासण्यासाठी, तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सुलभतेने पूर्ण व्हावे, यासाठी ही योजना आहे. या योजनेनुसार, शिष्यवृत्तीधारकांना इयत्ता बारावीपर्यंत दरमहा 1000 रुपये मिळतात तसेच पालकांचे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकतात, त्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीचे वाटप होते. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक समाधान दुधाट यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्रतिभावंत, हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. विद्यालयातील शंभूराजे शेळके, सार्थक दुधाट, सृष्टी माने, निकिता मोरे, सृष्टी मासाळ, कोमल जाधव, मैथिली राऊत व प्रिया माने यांनी यश संपादन केले. सदर विद्यार्थ्यांना भिवा चव्हाण, बळीरामम लोखंडे सरांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांवर तांदुळवाडी पंचक्रोशीतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रशाला समितीचे अध्यक्ष गणपतराव उघडे व सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.