वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांनी पालघर समुद्रकिनारी सापडलेले चरस विक्री करणारे दोन आरोपी ठाणे येथे केले जेरबंद
टाईम्स 9 न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर तालुक्यातील आलेवाडी गावाच्या समुद्रकिनारी चरस असलेली पाकिटे संजय अंभीरे यांना मिळाली होती ती पाकिटे त्यांनी त्यांचे नातेवाईक अभय परशुराम पागधरे (वय 43 ) यांच्याकडे दिली होती. हे चरस स्टारबक्स च्या पॉकेट मधून विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना घोडबंदर माजिवडे नाका ठाणे येथे पागधरे यास पकडण्यात आले यावेळी त्याच्याकडून आठ किलो वजनाचे सुमारे 80 लाख रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले.ही चरसची पाकिटे पालघर मधील आलेवाडी गावाच्या समुद्रकिनारी मिळाल्याची माहिती समोर आल्यावर पालघर जिल्ह्यातील 104 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील सर्व सागरी पोलीस ठाणे सतर्क झाली आहेत.
किनारपट्टीवर मिळालेली मादक द्रव्याचे पॉकेट स्वतः जवळ ठेऊन त्याचा दुरुपयोग न करता तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून ती त्वरित जमा करावी असे आवाहन जिल्ह्यातील पोलिसांनी केले आहे.समुद्रात एखाद्या व्यापारी जहाजाला अपघात झाल्या नंतर त्यातील असलेला माल समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून किनारपट्टीवर येत असतो.अश्या समुद्रातील अपघाताच्या घटना ह्या समुद्रात तुफानी वादळ वारे निर्माण झाल्या नंतर घडत असतात.कपडे,सिगारेट,कॅलक्युलेटर, यांत्रिक उपकरणे,मोबाईल कव्हर असे नानाविध वस्तू वाहत किनारपट्टीवर येत असल्याने अनेक मच्छिमार,स्थानिक लोक पहाटे किनारपट्टीवर फेरफटका मारीत असतात. किनाऱ्यावर काही विस्फोटक साहित्य मिळाल्यावर ते भंगार वाल्यांनी विकत घेतल्यावर त्यातून अपघात झाल्याची घटनाही या अगोदर घडल्या आहेत.सातपाटी सागरी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या आलेवाडी गावातील संजय अंभिरे ह्याना समुद्र किनारी अफगाण प्रोडक्ट असे नाव छापलेले ८किलो ८२ ग्राम वजनाचे चरस हे मादकद्रव्य मिळाले.त्यांनी हा चरस संबंधित सातपाटी सागरी पोलिसांच्या हवाली करण्या एवजी पैश्याच्या आमिषापोटी आपले डहाणू (कासा)येथील नातेवाईक अभय परशुराम पागधरे ह्याच्या कडे दिले.त्यानी ‘ स्टार बक्स ‘ च्या पॉकेट मधून ह्या चरस ची विक्रीचा घाट घातला व विक्री सुरू केली होती.
अभय हा घोडबंदर,माजिवडा नाका ,ठाणे येथे चरस विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे – ह्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला.आरोपी कडून आठ किलो वजनाचे सुमारे 80 लाख 82 हजार रुपये किमतीचे चरस त्यांनी जप्त केले.ह्या प्रकरणी वरील दोन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.ह्या प्रकरणात असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू असून पालघर जिल्ह्यातील अन्य सागरी पोलिसांनीही किनारपट्टीवरील गावात चरस सापडले असल्यास त्या व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधून मादक पदार्थ त्वरित जमा करावेत.जी व्यक्ती असे करेल त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.