पापाचा भरलाय घडा-दादा सरकारमधून बाहेर पडा, बारामतीत घोषणाबाजी, त्यावर अजित पवार म्हणाले….

प्रतिनिधी… रियाज मुलाणी मो. 9921500780
जालन्याच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्याच्या विविध शहरांत आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पापाचा भरलाय घडा-अजित पवार सरकारबाहेर पडा, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीवरून अजितदादांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कुणीही उठून काहीही घोषणा द्यायच्या, मागण्या करायच्या असं कुठं चालतंय व्हय… असं म्हणत अजित पवार यांनी घोषणाबाजी आणि करण्यात आलेल्या मागणीकडे कानाडोळा केला. तसेच तेथील सरपंचाला फोन लावून घडलेल्या घटनेची माहिती घेतली, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनानंतर अजित पवार यांनी उपसमितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांना बारामतीच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता त्यांनी आक्रमकपणाने उत्तर दिलं.
अजित पवार म्हणाले, बारामतीत आंदोलन झालं म्हणून माध्यमांनी त्या आंदोलनाची जास्त दखल घेतली. सरकारमधून बाहेर पडा, अशा घोषणाबाजी झाल्याचं माझ्या वाचनात आलं. त्यानंतर मी काटेवाडीच्या सरपंचांना फोन करून तेथील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अशी घोषणा देणारे आपल्या गावातील नव्हते, ते बाहेरचे होते, अशी माहिती मला सरपंचांनी दिली. तो कोण होता, कुठला होता माहिती नाही. उद्या कुणीही उठून काहीही मागणी करेल, याला काय अर्थ आहे. तो निदान सरपंच-उपसरपंच तरी असायला हवा होता… असं अजित पवार म्हणाले.