नशेखोरांना चाप लावण्यासाठी जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या सह पोलीस सक्रिय

टाईम्स 9 न्यूज नेटवर्क
विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी तीन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा व कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नशेखोरांवर चाप लावण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे व विक्री करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत
जव्हार शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचे गुन्हे रोखण्यासाठी पालघर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतील जनसंवाद
अभियानांतर्गत जव्हार पोलिस सक्रिय झाले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे स्वतः दंडुका घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. गल्लीबोळात मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसी खाक्या दाखवत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जव्हार शहरातील असंवेदनशील भागात स्वतः जाऊन पाहणी करत, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील बस स्थानक परिसर, न्यायालय इमारत, हनुमान पॉइंट, जुना राजवाडा, सनसेट पॉईंट या ठिकाणी स्वतः जाऊन नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शिवाय, अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नशेच्या गोळ्या पुरवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. प्रत्येक भागातील गस्तीचे बीट मार्शल निश्चित करून त्यांना एक मोबाइल क्रमांक देण्यात येणार आहे. तो क्रमांक नागरिकांनाही देण्यात येणार असून शहरातील नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जाणार असल्याचे शैलेश काळे यांनी सांगितले.