महाराष्ट्र

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अपयशाचे आणि संघ-भाजपाच्या यशाचे गमक.लोकशाहीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे कॉंग्रेसचे सद्य मॉडेल.-ॲड. शीतल शामराव चव्हाण

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांनी शाळा, महाविद्यालये, सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंका स्थापन केल्या. हे सगळे समाजासाठी उपयुक्त काम आहे. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जूने नेते या जुन्या कामावर आणि संस्थात्मक जाळ्यावरच तृप्त झाले. या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी, या संस्थांवर अवलंबून असलेले नागरिक आणि या संस्थांतून मिळणारा मलिदा एवढ्या भांडवलावरच कॉंग्रेसवाल्यांनी आपले राजकारण दामटले.

वास्तविक पाहता नव्या आर्थिक धोरणांनी सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. शिवाय या क्षेत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार माजला असल्याने या संस्थांबद्दल लोकांच्या मनात असलेला आदरभाव संपलेला आहे. संस्थांमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि इतर अनेक मार्गाने संस्थाचालक मोठ्या प्रमाणात पैसा कमवत असतात, हे सर्वज्ञात झाले आहे. अब्जावधीची मालमत्ता या संस्थात्मक जाळ्यांच्या माध्यमातून साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांनी जमवलेली आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष हा मुख्यत: अशा संस्थानिकांवर अवलंबून आहे आणि या संस्थानिकांचे राजकारण मुख्यत: आपल्या संस्थांवर अवलंबून आहे, ज्या एकतर कोलमडल्या आहेत किंवा भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते दिर्घकाळ मिळालेल्या सत्तेतून स्वत: गबरगंड झाले आहेत. पक्ष मोठा करण्यापेक्षा त्यांनी स्वत: मोठे होण्याला प्राधान्य दिले. त्यामूळे अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत ते गुंतलेले आहेत. आपल्या संस्था टिकवणे आणि आपल्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतून सुटका मिळवणे यालाच ते सर्वप्रथम प्राधान्य देतात. म्हणूनच ते सतत भयग्रस्त असतात. अशा भयग्रस्त नेत्यांना गप्प बसवणे, निष्क्रिय करणे, फोडणे सहज शक्य असते; जे की संघ-भाजपा करत आली आहे.

संघ-भाजपाकडे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, मोठे नेते, गौरवशाली इतिहास, मोठ्या संस्था, संस्थाचालक यापैकी काहीही नसताना आज ते सत्तेत आहेत. कारण, त्यांनी सांस्कृतिक राजकारणाला प्राधान्य दिले. त्यांनी ‘शुभं करोती’ शिकवत लहानांनासुद्धा आपलेसे केले. धर्म, देव, देश, परंपरा, सण-उत्सव अशा सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला. संघटन, पक्ष बळकट केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्या. व्यक्ती हा पक्ष-संघटनेपेक्षा मोठा होणार नाही याची काळजी घेत-घेत काम केले. सत्तेत आल्यानंतर उद्योगपतींकडून मिळणारा पैसा हा नेत्यांकडे न जावू देता पार्टी फंडाकडे वळवण्यावर भर दिला.

यामूळे पक्ष श्रीमंत, समृद्ध झाला. कुजबुज निती, प्रशासनात आपले लोक पसरवणे, सोशल मिडिया प्रभावीपणे वापरणे आणि छोट्या-छोट्या मुद्यांवरही सतत कार्यरत राहणे ही धोरणे अवलंबली. संघ-भाजपवाले नेत्या, कार्यकर्त्यांना सतत काहीतरी मोहिम आणि काम देत राहिले. या सगळ्याला प्रमोद महाजन ते मोदी-शहा यांनी उद्योगपतींकडून मिळणाऱ्या पार्टी फंडाची जोड दिली. अशारितीने संघ-भाजपाने सांस्कृतिक राजकारण करित करितच सत्ता-संपत्तीच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले.

आजमितिला कॉंग्रेस आपले जुनेच मॉडेल घेवून संघ-भाजपासोबत लढत आहे. राहुल गांधी वगळता देशातील महत्वाच्या प्रश्नांवर बोलायला कॉंग्रेसकडे सक्रिय नेते नाहीत. असलेले शांत आहेत.

आपले जुने मॉडेल घेवून कॉंग्रेस संघ-भाजपाचा पराभव करणे केवळ अशक्य आहे. जनतेने संघ-भाजपला कंटाळावे आणि ‘ॲंटी-इंन्कबंसी फॅक्टर’चा लाभ घेवून कॉंग्रेसने पुन्हा सत्तेत यावे, एवढीच एक शक्यता आहे.
संघ-भाजपाला खऱ्या अर्थाने हरवायचे असेल तर कॉंग्रेसला आपले मॉडेल बदलावे लागेल. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि संघटनात्मक भूमिकांची पुनर्रचना करावी लागेल. कॉंग्रेसने हे केले नाही तर भारतात केवळ राजकीय सत्तांतर होईल. अजेंडा मात्र संघ-भाजपाच छुप्या पद्धतीने राबवेल.भारतात संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही रुजवण्यात संघ-भाजपा तर अडसर आहेच पण कॉंग्रेसचे सद्य मॉडेल हा त्याहूनही मोठा अडथळा आहे.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button