चारित्र्याचे शीघ्रपतन आणि ‘लोकशाही’चे अध:पतन—ॲड.शीतल चव्हाणमो.–9921 657 346

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
‘मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही’ असे अटलबिहारी वाजपेयी खुलेपणाने सांगायचे. आपल्या बीयर/वाईन पिण्याची कबूली बाळासाहेब ठाकरे मुलाखती व भाषणांमधून खुलेआम द्यायचे. ‘समाजाचे पुढारपण स्विकारलेले असले तरी आम्हीही माणसं आहोत. ज्या लोकांचे आम्ही पुढारपण करतो त्या लोकांसारखेच आमच्यातही गुण-दोष आहेत’ हे दर्शवणाऱ्या या स्पष्टोक्त्या आहेत. अशी स्पष्टोक्ती देणारी माणसं आपल्या व्यक्तिगत जीवनात काही भलं-बुरं करीत असली तरी त्यांच्या कृतींनी विकृतीचा कळस गाठलेला नसतो.
अलिकडे लोकशाहीच्या अध:पतनासह राजकीय पुढाऱ्यांच्या चारित्र्याचे शीघ्रपतन झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. किरिट सोमय्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमूळे राजकीय नेत्यांच्या नैतिकतेबद्दल बरीच चर्चा घडत आहे. पण ही चर्चा व्यक्तिकेंद्री आणि प्रासंगिक आहे. अशा घटना घडण्यामागची पार्श्वभूमीही तपासली गेली पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडे काही निर्णयांद्वारे समलिंगी संबंध व ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ला मान्यता दिली आहे. ‘नैतिकतेच्या संकल्पना या कालानुरुप बदलत असतात’ असे महाराष्ट्रातील डांस बारवरील बंदि उठवताना दिलेल्या निर्णयात खुद्द सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत बसून, कामकाज चालू असताना ‘ब्लू फिल्म’ पाहताना सापडले आहेत. नेत्यांचे विबाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना भारतात आजवर उघड झाल्या आहेत. सरंजामशाहीचे अवशेष आजही ठळकपणे अस्तित्वात असलेल्या आमच्या देशात राजकीय पुढाऱ्यांच्या लफड्यांची चर्चा हा टीकेचा नव्हे तर त्या पुढाऱ्याच्या मोठेपणाचा विषय म्हणून मनोरंजनात्मक पद्धतीने चघळला जातो. आपल्या खास लोकांसोबत उंची दारु पिणे, गुंडगिरी करणे, भ्रष्टाचार करणे, हाफ्ते खाणे, अनेक बायकांसोबत संबंध प्रस्थापित करणे, टवाळ पोरांची झुंड सांभाळणे आणि त्यांच्याकरवी शक्तीप्रदर्शन करीत राहणे, आपला दबाव वापरुन न होणारे, बेकायदेशीर कामही करवून घेणे, कार्यकर्त्यांना त्यांच्या लफड्यांमधून सोडवणे, तमाशा थिअटर गाजवणे, ‘फार्म हाउस’वर पोरी नाचवणे हे आमच्याकडील राजकारणाचे ‘प्रि-क्वालिफिकेशन’ झाले आहे. हे सगळे करता येणारा नेताच दबंग, ढाण्या वाघ, राजा माणूस, दिलदार, तरुणांच्या गळ्यातील ताईत वगैरे म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रतिनिधीला सेवक न समजता ‘राजा’ समजणाऱ्या जनतेला नेत्यांचे असे वागणे काहीही वावगे वाटत नाही. उलट तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे अशी समज जनतेमध्ये पक्की झालेली असते.
बरं, नेत्यांची अशी अवस्था आहे पण सर्वसामान्य माणसं तरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कुठे धुतल्या तांदळाची असतात. लोकलमध्ये, बसमध्ये, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक गर्दीच्या प्रसंगी, सोशल मिडियावर अशा सर्व जागी हापापलेले जीव मुलींशी, बायकांशी लगट करायला सरसावलेले असतात. नैतिकता, एकपत्नीत्व, एकनिष्ठपणा वगैरे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. वास्तविक पाहता संधी मिळेल तिथे आपल्या वासनांचे सोने करायला तयार असलेल्यांची संख्या फार मोठी आहे. संधी न मिळाल्याने काही लोक ‘चरित्रवान’ म्हणून चुकून शिल्लक राहिलेले आहेत. पण संधी मिळाली की चारित्र्याचे ‘शीघ्र’पतन व्हायला वेळ लागत नाही. किरिट सोमय्यांनी जे केले ते उघड झाले म्हणून केवळ त्यांच्याभोवती राजकीय अर्थाने ही चर्चा रंगली आहे. पण किरिट सोमय्यांच्या पंगतीतले अनेक महाभाग राजकीय वर्तूळात आहेत. सर्वसामान्य माणसांच्या किंवा नेत्यांच्या नैतिक अध:पतनाला ते ज्या व्यवस्थेत जगतात ती व्यवस्थाही कारणीभूत असते. म्हणूनच बऱ्याचवेळेला आधीच्या व्यवस्थेत अनैतिक ठरवलेल्या कित्येक गोष्टींना कायदेशीर मान्यता देण्याची नामुष्की व्यवस्थेवर येते.
भांडवली व्यवस्थेत माणूस त्याच्या कामातून मिळणाऱ्या सृजनाच्या आनंदापासून तुटतो, एकटा पडतो. बाजार-नफा-तोटा-पैसा हाच जगण्याचा केंद्रबिंदू होतो.
भांडवलदारांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचा खप व्हावा यासाठी लोकांना चंगळवादी, वस्तूकेंद्री बनवणे भाग पडते. जगण्याच्या सर्व क्षेत्रांचे बाजारीकरण आणि माणसांच्या भावनांचे वस्तूकरण होते. काहीही सहज राहत नाही. अशा अवस्थेत अनेक मानसिक समस्या निर्माण होतात. माणसाच्या नैसर्गिक भावना चुकीच्या पद्धतीने, विकृत वळण घेत बाहेर पडतात. जगण्यात सुख, समाधान न उरल्याने अनैसर्गिक मार्गाने, नको ते करुन सुख, समाधान मिळवण्याची धडपड सुरु होते.
किरिट सोमय्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते एका महिलेसोबत व्हिडिओ कॉलद्वारे लैंगिक वर्तन करताना दिसत आहेत. अलिकडे ‘फोन सेक्स’ची ‘फॅशन’ आली आहे. संभोगाच्या कृती फोनद्वारे बोलून जोडपे मानसिक समाधान मिळवतात. काही जोडपे व्हिडिओ कॉलद्वारे लैंगिक भावना व्यक्त करुन, एकमेकांच्या गुप्तांगांना बघून समाधान मिळवतात. ‘फोन सेक्स’च्या नावाखाली ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्यांचे मोठे रॅकेट आहे. क्षणभराच्या अनैसर्गिक लैंगिक सुखासाठी फोन सेक्सच्या व त्याद्वारे केल्या जाणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात फसून अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे.
अनेकांनी आपले लफडे उघडे पडेल या भीतीने आत्महत्या केलेल्या आहेत. किरिट सोमय्या जरी वरकरणी नेते, पुढारी, समाजसेवक असल्याचा आव आणत असले तरी त्यांची अवस्था वाट चुकलेल्या, मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त व पंगू झालेल्या, अनैसर्गिक कृती करण्याच्या विकृत वळणाला लागलेल्या सर्वसामान्य माणसासारखी आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे कुठल्याही घटनांची, व्यक्तिगत कृतींची मिमांसा ही वरकरणी केली जाते. पण घटनांचा, व्यक्तिगत कृतींचा संबंध ज्या व्यवस्थेत अशा घटना व कृती घडतात त्या व्यवस्थेशी घट्टपणे जोडलेला असतो. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हा मृत्यू’ असं तत्वज्ञान सांगणाऱ्या देशात ‘हाताने गाळा, एड्स टाळा’ असा प्रचार करण्याची वेळ आली. अशा मथळ्याखालील प्रचार मोहिम ही समाजात वेश्यागमनाचे, विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे हे अधोरेखित करते.
आधुनिकीकरण आले, तंत्रज्ञानाच्या विकासाने गगनभरारी घेतली पण याचा परिणाम म्हणून माणूस एकटा पडत गेला, मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला आणि त्याच्या चरित्राचे शीघ्रपतन होवू लागले.
जी अवस्था चरित्राच्या आणि नैतिकतेच्या संकल्पनेची झाली तशीच अवस्था लोकशाहीच्या मुलभूत संकल्पनेचीही झाली. आपल्या कुटुंबाशी, जीवन भराच्या जोडीदाराशी प्रामाणिक नसलेली नेते मंडळी पक्षाशी, देशाशी आणि जनतेशी कशी प्रामाणिक राहील? जशा व्यक्तिगत चारित्र्याच्या आणि नैतिकतेच्या संकल्पना भांडवली वावटळीत गळून पडल्या तशीच हालत राजकीय चरित्राचीही झाली. निवडणूकीदरम्यान दिलेली आश्वासने ही जुमलेबाजी होती असे पुढारी थेटपणे सांगू लागले. काही खोक्यांसाठी पक्ष बदलू लागले तर काही जमवलेले खोके वाचवण्यासाठी रातोरात आपल्या विरोधकांच्यात सामील होवू लागले.
एकमेकांवर केलेले टोकाचे आरोप-प्रत्यारोप विसरुन अचानक एकत्र येवू लागले. देशाची जी अपरिमित लूट चालू आहे, त्याबद्दल तर बोलायलाच सोय नाही. इंग्रजांनी लूटले नसेल एवढे देशाला लुटून देशातील नेत्यांनी परदेशी बॅंकांत पैसा ठेवला आहे. भारतमाता ही आई पण आईचीही अब्रू लुटणाऱ्या औलादिंची पैदास लोकशाहीत झाली. या लूटीला जनतेचाही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. पैसे, मटन, दारु घेवून मतं देणारी, जात-धर्म-नातेगोते याला भुलणारी जनता तसल्याच प्रकारचे नेते जन्माला घालणार हे साधे गणित आहे. जसे चारित्र्याचे आणि नैतिकतेचे शीघ्रपतन झाले, त्याच गतीने लोकशाहीचेही अध:पतन होताना आपण पाहत आहोत. भांडवली, पैसाकेंद्री व्यवस्था माणसाचे माणूसपण हिरावून घेत आहे. एका दिशाहीन परिस्थितीत आम्हा सगळ्यांना ढकलत आहे. किरिट सोमय्यांच्या प्रकरणाचा विचार तुटकपणे न करता समग्रपणे केला पाहिजे. जी व्यवस्था माणसांच्या चारित्र्याचे शीघ्रपतन आणि लोकशाहीचे अध:पतन घडवून आणते ती व्यवस्था बदलण्याच्या भूमिकेतून अशा घटनांचा विचार व्हायला पाहिजे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)



