गुण महत्त्वाचे पण त्याहुन गुणवत्ता महत्वाची….

प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज
9226144836 (लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत)
दहावीचा रिझल्ट म्हटलं कि आधी पालकांनाच खूप टेन्शन येतं पण पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पाल्य म्हणजे स्वप्नपूर्तीचे पासबुक नव्हे.! तुम्हीच तुमच्या मुलांचा आधार आहात परीक्षा म्हणजे बऱ्याच मोठया रस्त्यातील एक टप्पा किंवा वळण आहे त्याच्याही पुढे तुमच्या मुलांना जायचे असते या दोन्ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणारी मशीन नाही. आजचे युग हे जीवघेण्या स्पर्धेचे आहे. अगदी जन्माला आल्यापासून ही स्पर्धा चालू होते. हा तान कधीकधी शालेय विद्यार्थ्यांना एवढा होतो की या त्रासापासून मुक्त होण्यासाठी ते आपले जीवन संपवून टाकतात. या सर्वच गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासूनच होते कारण प्रत्येक पालकाला आपला पाल्य सर्वात पुढेपुढे म्हणजे शाळेतील कोणत्याही परीक्षेत, स्पर्धेत सर्वांच्या पुढे राहिला पाहिजे असेच वाटते. पालकांनी व शिक्षकांनी गुणांचा अट्टहास धरला की विद्यार्थ्यांचा कोंडमारा होतो व त्यातून मुलांना कमी गुण मिळाले की त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येतो. केवळ परीक्षेतील गुण म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता नव्हे हे पालक व शिक्षकांना कळले पाहिजे.
समाजात वावरताना एक दृष्टीक्षेप टाकून पाहिल्यास मुलांच्या गुणांची चिंता सुशिक्षित, शिकून स्थिर झालेले व स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांना आहे. परीक्षेमध्ये गुण मिळविणे हे एक तंत्र आहे. परीक्षेमधील विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे लिहून गुण मिळवले जातात. यासाठी गाईड, घोकंपट्टी व खाजगी क्लासेस यासारखे अनेक पर्याय वापरले जातात तर गुणवत्ता म्हणजे कार्यक्षमता, हुशारी आणि प्रामाणिकपणा या तीन गुणांचा समुचय होय. आज आमची सगळी शिक्षण व्यवस्था दहावी व बारावीच्या निकालाच्या भोवती फिरताना दिसते. पण खरे गुणवान व गुणवत्ताधारक या व्यवस्थेत टिकून राहतात हेही सत्य नाकारून चालत नाही. कारण इतिहासात डोकावून पाहिले तर गुणांच्या मोजपट्टीत न बसणार्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पराक्रमाची शिखरे उभी केली आहेत. गुण महत्त्वाचेच पण गुणवत्ता त्याहूनही अधिक मोलाची आहे कारण गुणवत्तेशिवाय गुणांचे खरे मोल कळत नाही, विद्यार्थ्यांनी शिकणे महत्त्वाचे आहे, पण त्यातून महत्त्वाचे असते काय, कोणते व कसे शिकावे. त्यासंबंधी निवडीचे स्वातंत्र्य त्यांना द्या. तुमच्या इच्छा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. मुलांच्या गुणावरून त्यांची किंमत व लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो हीच गोष्ट आपण जगायला लायक आहोत. गुण सर्वस्व आहे असे नाही गुण काळाच्या प्रवाहात विसरले जातात पण गुणवत्ता वेगवेगळ्या काळात टिकून राहते.
दहावी पास झाल्यानंतर घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी म्हणून कलाशाखेत. कसंबसं किंवा शिकवण्या लावून, भरमसाठ फिया भरून पोरं गुणांच्या स्पर्धेत पळवत असतो. काय करणार. योग्य वेळी योग्य करिअर संदर्भात मार्गदर्शन मिळतच नाही. नाहीतर सोशल मिडीयावर मोटीव्हेशन, करिअर संदर्भातील अनेक व्हिडीओ पाहुन त्यांच्यासारखा विचार करुन पंधरा दिवस झपाटल्यासारखा अभ्यासासाठी मुलांच्या मागे लागतो. नंतर हळूहळू शांत. आजचा विद्यार्थी व पालक अर्धवट माहिती, अपुरं ज्ञान, क्रेझ आणि कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याच्या मोहत अडकले आहेत. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. पण त्यासाठी लागणारी माहिती, मेहनत, वेळ नको आहे. विज्ञान शाखेतील डॉक्टर, इंजिनिअर तर वाणिज्य शाखेतील सी.ए, सी.एस कोर्सेसच्या मागे धावतात. तिथं सगळेच जातात. म्हणून आपणही जायचं का ? नाही. जरा हटके, वेगळे करिअर निवडा. जेणे करून तुम्हाला समाधान व आनंद मिळेल.
स्पर्धेच्या धावत्या जगात धावण्याची ताकद अंगी असायला लागते, ही ताकद गुणपत्रिकेतील गुणांनी कशी मिळेल. त्याकरिता अंगभूत धाडस असायला लागते. जीवघेण्या स्पर्धेत काही कोवळे जीव अक्षम ठरतात. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. तेव्हा हे गुण मदतीला येतात का ? शिक्षणातून ज्ञान संवर्धन व्हावे ही अपेक्षा असते, पण हल्ली अशा गुणवानामधून ज्ञान संपादन करून स्वतःला सक्षम करून घेणारे किती आहेत? नुसत्या माहितीच्या गोण्या भरणे म्हणजे शिक्षण नव्हे. एखाद्या मुलाची टक्केवारी चांगली आहे पण तो उद्धटपणे वागतो, खोटे बोलतो, इतरांना दुःख होईल असी कृती करतो हे दोष त्याच्यात असतील तर तो हुशार म्हणायचा का ? एक प्रसंग मला आठवतो थ्री इडियट सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर गुणावर व देवावर आपली किंमत ठरविणारा, घाबरणारा मुलगा म्हणतो जिंदगी मे कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा.. हा आत्मविश्वास प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे…

प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज
9226144836 (लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)