महाराष्ट्र

सत्ता हेच राजकीय पक्षातील नेत्यांच्या डोक्यात आहे म्हणून देशाचे भवितव्य धोक्यात आहे -महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

किती तो सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी अट्टहास. अहो अट्टहास कसला लाचारी पत्करणे म्हणा. महाराष्ट्रात रोज दिवसाला नविन काहीतरी राजकीय घडामोडी होत आहेत. सर्वसामान्य माणसाला मूलभूत गरजांवर बोलण्याचा अधिकार नाही. टीव्ही लावली की हेच राजकीय घडामोडी, पेपर उघडला की पुन्हा त्याच राजकीय घडामोडी, मोबाईल उघडला की पुन्हा तेच राजकीय घडामोडी. अरे काय चाललंय काय देशात.

बेरोजगारी, तरुण, स्त्री, उद्योग , व्यवसाय, शिक्षण, हे महत्वाचे विषय बाजूला ठेवुन तुम्ही जात, धर्म, राजकारण, पक्ष, हे ते असल्या विषयांवर लोकांचे लक्ष आकर्षित करून सर्वसामान्य जनतेला सरळ सरळ येड्यात काढत आहात. एक ही नेता एक ही पक्ष या वरील विषयावर बोलण्यास तयार नाही. भारत कधी होणार महासत्ताक की ते फक्त स्वप्नच राहणार. हे राजकीय पक्ष तरी कसले हो सत्तेसाठी हापलेले असतात. जो तो नुसतं एकमेकांवर टीका करण्यात असतो. चूका काढण्यात व्यस्त असतो. नुसतं नावाला हे पक्ष आहेत. आणि याच सगळ्या राजकीय पक्षांना मी बोलताना पाहिलंय…!

देश विकला जातोय आपला. तरीही आपण शांत आहोत. कोणताच पक्ष देश हिताचं कार्य करत असताना दिसुन येत नाही. जो तो त्यांच्या त्यांच्या स्तरावर एकमेकांवर निशाणा साधून मस्त आहे. जिवंत आणि ज्वलंत प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही. कितीतरी लोक आजही बेरोजगार आहेत. कितीतरी लोक आजही बेघर आहेत. कितीतरी लोक आज उपाशी आहेत. याला जबाबदार कोण तर आपल्या देशातील राज्यातील ही राजकीय व्यवस्था होय. लोककल्याणकारी राज्य नाहीच आहे आपलं. राजकीय कल्याणकारी राज्य आहे आपलं. पक्ष बदलला की विकास होईल नविन बदल होईल म्हणून आशेवर बसलेली सर्वसामान्य जनता मात्र अशीच भ्रमात राहते. पण या लोकांना ही कळायला हवं.

कोणाच्या मागे जायचं आणि कोणाच्या मागे नाही जायचं ते. अरे ते राजकीय नेते जनतेचे सेवक आहेत नोकर आहेत. आपण त्यांचे मालक आहोत. पण आपणच आज त्यांना मालक मालक म्हणायची वेळ आली आहे. रोज झालेल्या घडामोडीवर पक्ष एकमेकांना बोलतात बर का…! काय नाही ओ पक्ष एकमेकांना समजून घेतात. समजावून ही सांगतात. ताटाशी ताट लावून निवांत रात्री जेवण ही करतात. साला उपाशी मरतो तो चाटु कार्यकर्ता आणि सामान्य जनता. विकास बरोबर प्रगती उपाशी मरते.

आणि युवक असतोच की झेंडे लावायला, घोषणा द्यायला, सतरंज्या उचलायला, जय म्हणायला, भाषण करायला, साहेबांच्या गाडीमागे पळायला. मी या पक्षाचा मी त्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून भांडण होतात. केस होते. घरी लोक चिंतेत असतात. हा पठया माझा पक्ष नेता येईल या आशेवर जेल मध्ये सडतो. पण शेवटी बाप येऊन पोलीस साहेबांच्या पायावर डोकं टेकवून रडतो आणि पोराला सोडवून घेऊन जातो. अस मी पक्षांना बोलताना ऐकलं आहे बर का…! हे वास्तव चित्र कुठंतरी बदललं पाहिजे. तरुणांच्या हातात सत्ता दिली पाहिजे.

देशाचा विकास करू पाहणाऱ्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. खुर्चीसाठी नाही तर देशाच्या विकासासाठी निवडणूका लागल्या पाहिजेत. जो तो इथे भारत मातेच्या कल्याणासाठी विकासासाठी जगला पाहिजे. तिरंग्या ला आपला देव देश धर्म म्हणून लढला पाहिजे. देशातील विविध प्रश्न मार्गी लागले पाहिजेत.राजकीय परिस्थिती आज ना उद्या बदलेल पण देश कधी बदलणार. देशातील परिस्थिती कधी बदलणार. यावर कुठंतरी चिंतन होणे गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत. माणूस भ्रमात जगतोय, राजकीय पक्षाला नेत्याला आपला आदर्श मानतोय. देशाच भवितव्य हे धोक्यात आहे.

सत्ता हेच फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात आहे. कोणत्यातरी मुद्द्यावर देशातील तरुणांना, नागरिकांना भडकवून हे राजकिय नेते बाजूला होतात आणि तमाशा बघायला मोकळे होतात. सर्वसामान्य जनता वेड्यासारखी यांच्यावर विश्वास ठेवून जगते. आणि विकास बाजूला राहतो. आणि दुसऱ्याच नावाखाली दंगली पेटतात, मोर्चे निघतात, आंदोलन होतात. राजकीय पक्षांची चर्चा संपत आली होती.

राजकीय पक्ष एकमेकांना सावरून घेतात.कार्यकर्ते मात्र एकमेकांना बघून घेतात. देश भरडून निघतो. यातच पाच वर्षे पूर्ण होतात. विकास बाजूला राहतो. प्रगती देशात पाऊल ठेवत नाही. खूप वाईट परिस्थिती देशाची होते. आणि यातच देशात वाढते गुन्हेगारी, बेरोजगारी आणि बरच काही. लोक शहाणी होईपर्यंत राजकीय पक्ष सत्तेवर आलेली असतात. मस्त मन लावून त्यांचा सत्तेचा आणि खुर्चीचा उपभोग घेणे चालू असते. मधेच काहीतरी नविन घडत. सत्तेच चाक जागेवर थांबत. मग चालू होतो नवीन विषय, नवीन मुद्दा, नविन घडामोडी, नविन चर्चा , नवीन मागणी आणि सगळं नवीन….पण सर्वसामान्य जनता आणि त्यांचे प्रश्न त्यांच्या मागण्या आणि अडचणी मात्र जुन्याच…

शेवटी राजकीय पक्षांच बोलणं संपत येत, आणि त्याचवेळी त्यांच्या लक्षात येत की, आता खूप उशीर झालाय. आणि सगळे पुन्हा सावध होतात.आपआपल्या मूळ भूमिकेत ते येतात. आणि सर्वसामान्य जनता मात्र तशीच कोपऱ्यात निपचित पडून राहते. पंख नसलेल्या पाखरासारखी…!

लेखक- महेश बजरंग कोळेकर
रा- काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि- धाराशिव.
संपर्क-९१४६१३३०४७/९५७९२२८३४७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button