आधुनिक युगात हरवत चाललेलं टपालखाते आणि पत्रव्यवहार एक खूप मोठी शोकांतिका…महेश कोळेकर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 868 448
एका पत्रात मनाला मन जोडणारा विश्वास दडलेला असायचा. पत्र हे फक्त पत्र नसायचं तर त्यात कितीतरी प्रेम, विश्वास, भावना लपलेल्या असायच्या. तो पत्रांचा जमानाच वेगळा होता. पत्र आज पाठवलं तर महिन्यांनी ते पत्र समोरच्याला मिळायचं आणि नंतर त्याला ते सुख दुःख कळायचा याला म्हणायचं संयम. मग पत्रव्यवहार मुळे नात्यात एक विश्वास होता, संयम होता, प्रेम होतं आणि सर्वात महत्वाचं खूप साऱ्या भावना दडलेल्या असायच्या.
गावागावातून ते सायकल येणारे पोस्टमन काका पत्र पोहचवत न्हवते तर सुख दुःखाचे संकेत घेऊन येत होते. पहिला पाऊस पडल्यानंतर जो मातीचा सुगंध येत होता ना तेवढाच सुगंध त्या पत्रातून यायचा. खर यार पहिलं प्रेम करणारे जोडपे किती विश्वासू असतील ना एकमेकांवर. ना भेट, ना पाहणं, ना कोणता दिवस तरीही एका पत्राच्या आशेवर वर्षवर्ष झुरत बसायचं.

परदेशी असणारा मुलगा आपल्या गावाकडील अडाणी आईबापाला पत्र लिहायचा आणि ते पत्र पाहून त्या आईबापाच्या चेहऱ्यावर जे सुख समाधान दिसत होतं. ते कुठेही विकत मिळणार नाही अगदी काळ्या बाजारात सुद्धा मिळणार नाही. एक पत्र आयुष्य घडवायचं तर एका पत्रामुळे आयुष्य सुद्धा उध्वस्त व्हायचं. पण हरवत चाललेलं हे टपाल खात याची कुठंतरी खंत वाटते. आज या सोशीलमीडिया च्या काळात काही सेकंदात भावना इकडच्या तिकडे कळतात. या सोशीलमीडिया मुळे संपूर्ण जग जवजवळ आलं.
पण खोटं सगळं खोटं. भावनाशून्य हे जग झालं. सगळे पत्रव्यवहार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या भारतीय टपाल खात्याच्या कितीतरी योजना आहेत आज त्यांच्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही. किती मोठी शोकांतिका आहे ही. तुम्हाला आठवत का हो आपण लहानपणी असताना ते पोस्टाचे विविध तिकिटे गोळा करून ठेवायचो. तो एक आपल्या मनाला जडलेला छंद होता. एक सांगू छंद लहान असो किंवा मोठा तो आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतो. वास्तव जगायला शिकवतो.

आयुष्याचा खरा भाव सांगतो. प्रेम युगलांची पत्रे वाचण्यासाठी किती तो अट्टहास आणि काळजात होणारी धडपड अतूट नाते एक आणि कोटी कोटी विश्वास खरच सार काही आज ते मावळताना दिसून येत आहे. प्रिय लिहून सुरू होणार पत्र मी फक्त तुझाच/तुझीच यावर संपायच. काहीपण म्हणा पण तेवढा विश्वास, संयम हा फक्त पत्रामुळे शक्य होत बर का! पत्र ही पत्र न्हवती तर त्यात खूप साऱ्या गोड आणि तिखट आठवणी दडलेल्या असायच्या. काही पत्र वाचताना डोळ्यातून पाणी यायचं तर काही पत्र फाडुन फेकून दिलेली असायची.
तर काही पत्र काळजाच्या कुपीत लपवून ठेवलेली असायची. तर काही पत्र चुरगुळा करून कोपऱ्यात तोंड खुपसून पडलेली दिसायची. गावातून जाताना प्रत्येक वेळी त्या पोस्टमन काकाला बघायचं आणि विचारायचं माझं पत्र आला का, मला कोणी पत्र पाठवलं का? नेहमी नाही आलं तुमचं पत्र हाच शब्द कानावर पडायचा. निराश हताश झालेलं मन मात्र जिद्द नाही सोडायच. नेहमी ते पुढच्या वेळेस नक्की पत्र येईल याच आशेवर जगायचं.

आणि अचानक एकेदिवशी पत्र यायचं मन मात्र वाचण्यासाठी व्याकुळ होऊन जायचं. काळीज नुसतं धडधड करायचं…. काळजाच्या कुशीत ते पत्र जपून एकांतात वाचायचं…. आणि त्यातील प्रत्येक शब्द नी शब्द काळजात कोरून ठेवायचा. आवडत्या व्यक्तीच पत्र पुन्हा पुन्हा वाचायचं. एखाद पत्र रागात चुरगुळा करून फाडून फेकून द्यायचं आणि पुन्हा ते कागदाचे तुकडे जोडून जोडून वाचायचं. किती ते प्रेम होतं ना त्या एका पत्रात. पण आता काय झालं अहो, जग डिजिटल झालं, भावनाशून्य हे जग झालं, प्रेम नाही राहील, माणुसकीचा कुठे पत्ता दिसत नाही, विश्वासाला स्वार्थापोटी तडे गेले, संयम थोडाही राहिला नाही…कारण आता जीव कोणाला कोणच लावत…आता जीव कोणाला कोण लावत नाही.
लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9579228347



