महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे वजन, रक्तगट नोंदविणे केली सक्तीचे. शिक्षकांकडून नाराजी व्यक्‍त-शिक्षक हैराण

(ठाणे जिल्हा प्रतिनिधी ) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क (मो.९०२८३०५६१९)

शैक्षणिक कामाशिवाय इतर कामे नको, यासाठी शिक्षकांची आंदोलने सुरू असतानाच आता शासनानेच शिक्षकांवर आणखी एका कामाचा भार टाकला.
यु-डायस प्लस पोर्टलवर नियमित माहितीबरोबर विद्यार्थ्यांचे वजन व रक्तगटाची माहिती भरावयाची आहे. त्यामुळे रक्तगट तपासणीचे वेगळेच काम शिक्षकांच्या मागे लागले. परिणामी, शिक्षक हैराण झाले आहेत.

यू-डायस प्लस प्रणालीद्वारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक,जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते.

दरवर्षी मुख्याध्यापकांना यू-डायसवर विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण माहिती अपलोड करावी लागेल. यात प्रामुख्याने 11 विभाग असून, 56 प्रकारची माहिती भरावी लागते. यंदा मात्र यात विद्यार्थ्यांचे रक्तगट लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. रक्तगट लिहिला नाही, तर माहिती स्वीकारली जात नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचा रक्तगट कुठून आणायचा, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे.

यू-डायसमध्ये एका विद्यार्थ्याची तब्बल 56 प्रकारचीमाहिती भरताना शिक्षकांची आधीच दमछाक होत असताना आता वजन व रक्तगट कसा भरायचा, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना रक्तगट माहिती नसतो. रक्तगट नमूद करायचा तर अंदाजे टाकून चालणार नाही. त्यासाठी रक्ताची तपासणी करावी लागणार आहे.

खेडेगावात रक्तगट तपासण्याची सुविधा नसते. पालकांना सांगितले, तर अनेक जण नाके मुरडतात. त्यामुळे शिक्षकांना पदरमोड करून शाळेतच रक्तगट तपासणी करण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. याबद्दल शिक्षकांनी आता नाराजी व्यक्‍त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button