महाराष्ट्र काँगेस प्रदेश अध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड…

विशेष प्रतिनिधी,संजय आवटे…
“ही लढाई आदर्शवादाची आहे,याचे भान कॉंग्रेसला ज्या दिवशी येईल, तेव्हाच या पक्षाला बरे दिवस येऊ शकतील!”
काही दिवसांपूर्वीच हे मी म्हणालो आणि त्या दिशेने कॉंग्रेसची पावले पडू लागल्याचा पहिला पुरावा मिळाला.
हर्षवर्धन सपकाळ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले.
हर्षवर्धन पहिल्यांदा भेटले ते मी अकोल्यात ‘लोकमत’चा संपादक असताना.तेव्हा हर्षवर्धन बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काय करू शकतो, याचा वस्तुपाठ म्हणून त्यांच्या त्या कामाकडे पाहायला हवे. सध्या सत्तेचे केंद्रीकरण सुरू असताना,जिल्हा परिषदेला अध्यक्ष असतो, हेही आपण विसरून गेलो आहोत.अशा वेळी तर हे वेगळेपण आणखी उठून दिसते.
सरपंच ते आमदार असा प्रवास करणारे हर्षवर्धन हे नेते कॉंग्रेसचेच. पण,सत्तेच्या टिपिकल सरंजामी वर्तुळापेक्षा वेगळे. सामान्य माणसाला आपले वाटणारे.ही लढाई आदर्शवादाची आहे, याचे नीट भान असलेले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या या काळात पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व जाणून असलेले.गांधी-नेहरू-आंबेडकरी विचार समजलेले.सर्वोदयी परिवाराशी नाते सांगणारे.
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला लोकसभेसारखेच यश मिळाले असते, तर मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यासाठी जिवाचे रान करू शकणारे नेते या पडत्या काळात मात्र पक्षसंघटनेत काम करायला तयार नव्हते.मुळातच,पक्षसंघटनेकडे कॉंग्रेसचे लक्ष होते कधी? सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता,एवढेच तत्त्वज्ञान शिकत गेलेला हा संधिसाधू पक्ष त्यामुळेच कमकुवत झाला.सत्ता गेल्याने तो दुबळा झाला नाही. मूळ विचार,आदर्शवाद यांचे भान हरवल्याने आणि पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष झाल्याने कॉंग्रेसचे हे असे झाले.
मी मागे म्हटले होते-
“कॉंग्रेस महाराष्ट्रात पराभूत झाली. दिल्लीत हरली. आता ती सगळीकडे हरावी.महापालिका आणि जिल्हा परिषदांतही पराभूत व्हावी. उरलेल्या सगळ्या विखे-चव्हाणांनी ती सोडावी. तरच कॉंग्रेसला काही भवितव्य आहे. सत्तेचे भूत उतरल्याशिवाय आणि पुन्हा राष्ट्रीय चळवळ झाल्याशिवाय कॉंग्रेसला काही आशा नाही.”
लोक कॉंग्रेससोबत आहेतच. कॉंग्रेस कुठे आहे,असा प्रश्न आहे.हर्षवर्धन यांच्या दमदार निवडीने कॉंग्रेसने सुखद धक्का दिला आहे.हर्षवर्धन यांच्यामुळे झालेला हा हर्ष असाच वाढेल की ते फक्त ‘फ्लूक’ ठरेल,हे येणारा काळच सांगेल.
बाकी,सन्मित्राला सदिच्छा तर आहेतच…