अजित पवार, दत्तात्रय भरणे व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळें, हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसवलं. सुप्रिया सुळे नाराज?
इंदापूर प्रतिनिधी समिर शेख टाईम्स 9 मराठी न्यूज
मो 9766863786
इंदापुरातील एका सरकारी कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांना स्थानिक खासदार असूनही व्यासपीठावर स्थान मिळालं नाही, यावरून नाराजीनाट्य उभं राहिलं. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार , क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते, मात्र सुप्रिया सुळे यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं.
सुळे यांनी या कार्यक्रमात सरकारी शिष्टाचार (Protocol) न पाळल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. स्थानिक खासदार असूनही कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव नसल्याची तक्रार त्यांनी केली. हा मुद्दा विरोधकांच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार घडत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
खासदार असूनही व्यासपीठावर स्थान नाही :
इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, आणि सुप्रिया सुळे या त्या मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं, तसेच व्यासपीठावर त्यांच्यासाठी जागा राखीव नव्हती. परिणामी, त्यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं, आणि त्यांचा सत्कारही व्यासपीठावर न करता खालीच करण्यात आला.
कार्यक्रम सुरु होण्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधला. मात्र, भाऊ-बहिण असले तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचं पाहायला मिळालं.