मुलींना स्वावलंबी जीवन जगता येईल किमान इतके शिक्षण दिले पाहिजे… सपोनी विजया गोस्वामी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्हा हा आदिवासी व ग्रामीण भाग असून आजही येथे बालविवाहाचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल व स्वावलंबी जीवन जगता येईल किमान इतके शिक्षण दिले गेले पाहिजे असे मत केळवा सागरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी व्यक्त केले.
3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी ‘बालिका दिन’ व ‘महिला मुक्तीदिन’ साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे सफाळे देवभूमी येथे समाजातील कर्तृत्ववान महिला तसेच सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यावेळी सपोनी गोस्वामी बोलत होत्या.
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक- खाजगी फोटो अथवा व्हिडीओ टाकू नयेत त्याचा आवश्यक तेवढाच व सावधतेने वापर करावा. माझ्या कोणत्याही महिला भगिनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन अशी ग्वाही देखील केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी यावेळी दिली. तर संस्थेच्या अध्यक्ष सुमनताई मानकर यांनी प्रत्येक व्यक्तींमध्ये दैवी आणि राक्षसी अशा दोन्ही वृत्ती लपलेल्या असतात. राग, द्वेष, हेवा या राक्षसी प्रवृत्तीचा वेळच्या वेळी नाश करून एकोप्याने समाजाच्या कल्याणासाठी एक विचाराने कार्य केले पाहिजे असे आवाहन केले.
समाजात निःस्वार्थ भावनेने, तळमळीने व सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण, भावनिक- बौद्धिक वाढ अशा सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक महिला वर्ग यांचा मोलाचा वाटा असतो. याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संघर्ष संघटनेमार्फत ‘सावित्रीच्या लेकी, ‘सेवाभावी पुरस्कार’ आणि ‘क्रांती ज्योती पुरस्कार’ असे विविध पुरस्कार देण्यात आले. यावेळी पुरस्कृत व्यक्तींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई मानकर, प्रमुख पाहुण्या केळवे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, संघटनेचे सरचिटणीस आर.बी. सिंग, सफाळे ग्रामपंचायत सरपंच तनुजा किणी, पीएसआय ज्ञानेश्वर सावंत, मुख्य सेविका सूर्यवंशी मॅडम, आदी विविध मान्यवर उपस्थित होते.