दहिगाव उपसाच्या बंदिस्त पाईप लाईन कामात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या हेतूचा वास – माजी आमदार नारायण पाटील यांचा थेट आरोप
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
दहिगाव उपसाच्या बंदिस्त पाईप लाईन कामात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या हेतूचा वास येत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केला आहे. सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईप लाईनचे काम चालू असुन यात शेतकऱ्यांना विचारात न घेता यास सुरुवात केल्याचे सांगत माजी आमदार नारायण पाटील यांनी शेतकऱ्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की वास्तविक पाहता बंदिस्त पाईप लाईन द्वारे पाणी देणे हा प्रकार जलसंपदा विभागाने प्रायोगिक तत्वावर आणला आहे. आता नव्याने सुरु झालेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत हा प्रयोग राबविला पाहिजे की नको याचा निर्णय एखादी आमसभा घेऊनच अंतिम करायला हवा होता. परंतू केवळ आर्थिक नफा नजरेसमोर ठेऊन हे काम विधानसभा निवडणुकीस चार पाच महिने बाकी राहिले असताना हाती घेतले गेले आहे.
या कामाचे ठेकेदार कोण आहेत आणि प्रत्यक्षात काम कोण करत आहे हे विचारात घेतले तर यातून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा दुषित हेतू ठळकपणे दिसून येतो. वास्तविक पाहता पुर्व भागातील २५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन कामाची गरजच नव्हती. या योजनेचे हक्काचे १.८० टि एम सी पाणी जर या भागात चाऱ्यांच्या माध्यमातून दिले गेले तर मोठ्या प्रमाणात परक्युलेशन होऊन या भागातील विहिरी आणि कुपनलिका यांची पाणी पातळी वाढली असती.
त्याचा अप्रत्यक्ष फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला असता. राज्यातील जुन्या उपसा सिंचन योजना ह्या आज तीस वर्षाहुन अधिक काळ झाले तरी उघड चाऱ्यातूनच पाणी वाटप करीत आहेत. कित्येक ठिकाणी तर मुख्य चारी सुध्दा अस्तरिकरणा शिवाय रहावी , अस्तरीकरण नको यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केल्याची उदाहरणे आहेत् यामुळे मग दहिगाव उपसाच्या बाबतीतच एवढी घाई का हे आता शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. मुख्य चारी बरोबरच २७ उपचाऱ्या असुन यातील केवळ सतरा उपचाऱ्यांची कामे झाली आहेत. अजून दहा उपचाऱ्यांची कामे बाकी आहेत.
तसे पाहिले तर मुख्य चारीमध्येच तांत्रीक चुका असल्याने टेलपर्यंत पाणी योग्य दाबाने जात नाही. इलेक्ट्रीक पंप का बंद ठेवले जात आहेत, पुर्ण क्षमतेने पाणी उपसा का होत नाही या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. मग यातही काही राजकीय हेतू आहेत का हे तपासून पाहिले पाहिजे. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईप लाईन द्वारे कामाचा फेर विचार करावा असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले.