नागझरी येथील “नागेश्वर महादेव मंदिरात” महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.9028305319)
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
राज्यातच नाही तर देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करून उपवास करतात. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते.
विक्रमगड तालुक्यातील नागझरी येथे पुरातन पांडवकालीन स्वयंभु शिवमंदिर असून तेथे महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी जमली होती .सकाळपासूनच नागेश्वर महादेव मंदिर परिसरात भाविकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. हर हर महादेव, श्री प्रभू नागेश्वर महादेव की जय, असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत होते. महादेव च्या दर्शनासाठी अनेक भागातून भक्त आले होते. अनेक दुकानांची गर्दी होती, त्यामुळे मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप आलेले होते.
दर्शनासाठी आलेल्या भक्तांना शिव प्रसाद म्हणून शिवभक्त मावळे मंडळ, विक्रमगड यांच्याकडून मंडळाचे अध्यक्ष श्री.पंकज पाटील, शिवभक्त चेतन जाधव, दामोदर गुप्ता, राजन गुप्ता, लक्ष्मण विश्वकर्मा यांनी दरवर्षी प्रमाणे शिव प्रसाद म्हणून सफरचंद,द्राक्ष,संत्री,मोसंबी आणि खजूर या शिवप्रसादच वाटप भक्तांना केले. त्याचप्रमाणे श्री.भगवान भोईर व श्री. केतन पटेल यांनी पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी ठिक ठिकाणी रस्त्यात थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.