महाराष्ट्र

संत रोहिदासनगर विक्रमगड येथे ” संविधान दिन ” मोठया उत्साहात साजरा

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज

विक्रमगड : पालघर जिल्यातील विक्रमगड तालुक्यातील संत रोहिदास नगर येथे ‘संत रोहिदास समाज सभागृह’ मध्ये संविधान दिन साजरा केला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानचे पुजन करुन उद्देशिकाचे वाचन केले. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी आपण भारतीय लोकांनी घटना सभेत आपल्याला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची घटना भेट दिली.

राज्यघटना हा या देशातील सर्वोच्च कायदा असल्याने २०१५ पर्यंत कायदा क्षेत्रातील मंडळी हा दिवस ‘कायदा दिन’ म्हणून पाळत होती, तर देशातल्या शैक्षणिक संस्थांसाठी तो ‘घटना दिन’ होता.त्यानंतर २०१५ साली केंद्र सरकारने तो ‘राज्यघटना दिवस’ म्हणून साजरा करण्याचे अधिकृतपणे ठरवले आणि तेव्हापासून २६ नोव्हेंबर हा घटना दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात घटनेविषयी प्रचंड अज्ञान आहे. घटनेनुसार आपली कर्तव्ये कोणती आहेत हे नागरिकांना कळले पाहिजे. राज्यघटनेशी बांधील राहणे हे घटनेनुसार पहिले मूलभूत कर्तव्य आहे.

आपण घटनेची उद्दिष्टे आणि संस्थांचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत याबद्दलही सन्मान बाळगला पाहिजे. घटनेशी बांधील राहायचे तर अर्थातच ती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि म्हणून ‘घटना दिवस’ हा राज्यघटनेविषयी साक्षरता निर्माण करणारा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. राज्यघटनेने ठरवून दिलेल्या मूलभूत कर्तव्यांवर सर्वांनीच भर दिला पाहिजे. सार्वभौमत्वाचे रक्षण, भारताचे ऐक्य व एकात्मता, देशाचे संरक्षण, सलोखा व भ्रातृभाव वाढवणे, मानवता-करुणा आणि परिवर्तनाप्रती आदर, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, हिंसाचारापासून दूर राहणे, ही त्यातली काही मूलभूत कर्तव्ये आहेत.चांगला नागरिक कायदा पाळतोच. प्रगल्भ नागरिकत्व व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हिताला सर्वोच्च महत्त्व देते.

व्यक्तीने नागरिक म्हणून ठराविक पातळीवरील स्वयंशिस्त पाळली पाहिजे, इतरांच्या हक्कांचा आदर केला पाहिजे, समाजाप्रती आपल्या कर्तव्याची पूर्ती केली पाहिजे, तसेच आपले मूलभूत हक्क आणि नागरिक म्हणून कर्तव्ये बजावताना लोकशाही मार्ग अनुसरून शांततापूर्ण जीवनासाठी स्वतःला तयार केले पाहिजे. अशा जबाबदार नागरिकत्वातूनच व्यक्ती आणि समाजाचा पूर्णपणे विकास होऊन परिपक्व लोकशाहीचे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकार होईल.घटनेत सांगितलेली ११ मूलभूत कर्तव्ये आपल्यापैकी प्रत्येकावर नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहेत. याशिवाय घटनेचे व्यवस्थित पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी घटनेच्या प्रत्येक कलमाने नागरिकांवर टाकली आहे. अशाप्रकारे भारतीय संविधानाचे मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी- जवानांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री.रविंद्र पारखे साहेब ,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी, संत रोहीदास महाराज समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडीया (आठवले) पक्षाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन चे पदाधिकारी व सर्व समाजबांधव एकत्रित येऊन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button