कोचिंग क्लासेसमुळे महाविद्यालये धोक्यात…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
उच्च शिक्षणासाठी बारावीची परीक्षा द्यावीच लागते त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. परवा सहज मित्रांबरोबर गप्पा मारताना त्याने सांगीतले मुलाच्या ११ वी प्रवेशासाठी एका क. महाविद्यालयात गेलो. मुलाला गुण चांगले होते. तो बोलायच्या आत प्राचार्यांनी दोन ऑफर दिल्या. एक म्हणजे प्रवेश शुल्क भरून वर्षभर शाळेत या किंवा नका येऊ. डायरेक्ट परीक्षेला आला तरी चालेल. त्याचे बोलणे ऐकून मी हादरलोच. हे असे कसे सांगू शकतात? नंतर तर धक्काच बसला कारण पुढे त्यांने सांगितले पास तर सोडाच पण ७५ टक्केपेक्षा जास्त गुणाची गॅरंटी दिली. एवढ्यावरच थांबले नाहीत तर NEET, CET, JEE च्या शिकवणीसाठी लातूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथील कोचिंग क्लास सेंटरचा पत्ता, फोन नंबर दिले आणि तिथे माझे नाव सांगा. असे सांगितले. मला कसं तरी होत होतं. हे सर्व पाहुन मनात अनेक प्रश्नाचे कल्लोळ माजले. क. महाविद्यालयाचे अस्तित्व फक्त प्रवेश आणि परीक्षेपुरतेच का ? मुलांच्या हजेरी चे काय? प्रत्यक्ष अनुभूती, प्रात्यक्षिक परीक्षेचे काय ? संस्काराचे काय ? अशा परिस्थितीतीला कारणीभूत कोण?
अलीकडे शहरी व ग्रामीण भागात काही अपवाद वगळता विज्ञान शाखेत याचे प्रमाण जास्त आहे. पालकांना व विद्यार्थ्यांना काॅलेज प्रवेशाची चिंता दिसत नाही पण कोचिंग क्लास मधील प्रवेशाची चिंता दिसते. आज बऱ्याच ठिकाणी क. महाविद्यालय व कोचिंग क्लास यांची युती पहावयास मिळते. काही ठिकाणी तर शाळेचे वेळापत्रक शिकवणी वर्गावर अवलंबून आहे. क. महाविद्यालयांची पडताळणी केल्यानंतर दिसून येईल पटावरील विद्यार्थी व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांतील तफावत. अलीकडे नवीन ॲकॅडमीची पद्धत अस्तित्वात आली आहे. सर्व गोष्टी उकत्याच घेतल्या जातात. पालकांनी पैसे भरायचे आणि बाजूला व्हायचे. ॲकॅडमीवालेच प्रवेश, शिकवणी, परीक्षा, टक्केवारी, सर्व काही ॲडजेस करतात. पालकांनी ॲडजेस, तडजोड करावी पण मुलांच्या भविष्याची नको. आपल्या मुलाचे भविष्य अंधकारमय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. पालकांच्या मनात मुलांच्या समृद्ध शिक्षणापेक्षा गुणांचे अधिक आकर्षण दिसते. काय, किती, कसे शिकला किंवा मुलाला काय येते याला महत्त्व न देता त्याला किती गुण मिळाले हे महत्वाचे. पालकाची मानसिकता अशी आहे की माझ्या मुलाला शिकवणी लावल्याशिवाय सुधारणार नाही किंवा चांगले गुण मिळणार नाहीत म्हणून स्थानिक विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यालयात जास्त शुल्क भरून वाट्टेल तेथे शिकवणीसाठी, ॲकॅडमीत मुलांना पाठवतात. बरं त्यांचा सक्सेस रेसिओ पाहिला तर फारच कमी आहे. खऱ्या अर्थाने असे कितीतरी मुलं आहेत की शिकवणी किंवा ॲकॅडमीला न जाता शाळेतच अभ्यास करून उंच भरारी घेत आहेत.
अगदी पहिलीपासून शाळेपेक्षा शिकवणी वर्गावर विसंबून राहण्याची सवय मुलांना लावली जाते. त्यामुळे शाळा, क. महाविद्यालयात जाण्यापेक्षा शिकवणी किंवा ॲकॅडमीला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दोन्हीचे महत्त्व कमी होऊन शिक्षणाच्या अध:पतनाला सुरवात झाली आहे. अशा शिक्षणाच्या अधःपतनाला सरकारही तेवढेच जबाबदार आहे. मागेल त्याला महाविद्यालय देण्याची भूमिका असो किंवा बारावी परीक्षा घेण्याची परवानगी. काही ठिकाणी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित क. महाविद्यालयांना बोर्ड परीक्षेसाठी मान्यता दिली आहे. अशा परीक्षा सेंटरवरती काय काय चालते ते बोलूच नये. अशा परिस्थितीमुळे अनुदानित क. महाविद्यालयात कमी शुल्कामध्ये प्रवेश होईनात. प्रवेशासाठी गावोगावी शिक्षकांना फिरावे लागत आहे. प्रवेश झाले नाही तर अर्धवेळ किंवा अतिरिक्त होण्याचा धोका होऊन हळूहळू क. महाविद्यालय बंदचा धोका वाढला आहे. बरं जेे क. महाविद्यालय प्रामाणिकपणे कमी शुल्कामध्ये प्रवेश घेतात, शिक्षक दररोज शिकवितात, मुलांची हजेरी घेतात, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा बोर्ड परीक्षा प्रामाणिकपणे घेतात त्यांच्यावर अन्याय होत नाही का ?



