योग आणि मानसिक आरोग्य

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
योगशास्त्र हे मानवी जीवनातील सर्व अंगांचा एकत्रित विचार करणारे शास्त्र आहे ज्यामुळे मानवाची शारीरिक, मानसिक, आत्मिक व सामाजिक प्रगती साधली जाते. व्यक्तीचा विचार करताना शरीर व मन या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार योगशास्राने केलेला आहे. सर्वसामान्य माणसासाठी योग म्हणजे जीवनातील सुखदुःखाचा, चढउतारांचा स्वतःच्या जीवनावर विपरीत परीणाम होऊ न देता संयमाने,शांतपणे समाधानाने व आनंदाने जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिव्हिंग) होय. भगवत् गीतेमध्ये योग शब्दाची व्याख्या समत्वं योग उच्यते – समत्व बुध्दीने (ममत्व सोडून) वागणे म्हणजे योग ,योग:कर्मसु कौशलम् – केवल आसन इत्यादी गोष्टीतच नव्हे तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म कौशल्यपूर्वक करणे म्हणजे योग, दुःखसंयोगवियोगं – दुःखापासून दूर करणारा तो योग तसेच योगवासिष्ठ मध्ये मनःप्रशमन उपाय योग:- मनातील द्वंद नाहीशी करण्यासाठीचा उपाय किंवा मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे योग.
संपूर्ण योगशास्त्र ज्या सूत्राभोवती फिरते त्यानुसार महर्षि पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ति निरोधः चित्त म्हणजे मन,चित्त वृत्ती म्हणजे मनाच्या विविध वृत्ती निरोध करणे म्हणजे दमन करणे किंवा त्यांचे नियमन करणे चित्तवृत्तिचा निरोध करणे म्हणजे योग.
याचा अर्थ मनाची चंचलता नाहीशी करून आपल्या मनाला अधिक सुखकर,आनंदी जीवनपध्दतीकडे वळविणे आणि आत्मोन्नती साधून घेणे असे सामर्थ्य योगामध्ये आहे. संसारी माणसाने आपले शरीर सुदृढ राखण्यासाठी काय केले पाहिजे मनावर ताबा कसा ठेवला पाहिजे, आनंदाने समाधानी जीवन कसे व्यतीत करता येईल हे समजून घेऊन जीवन जगल्यास योग साधल्याचे समाधान मिळते. आपली प्रकृती सदृढ असणे म्हणजे आजाराचा अभाव असा असा अर्थ होत नाही तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक पातळीवर स्वास्थ्य असण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे, यासाठी अष्टांगयोगातील आठ अंगापैकी पहिली पाच अंगे आहेत त्यांना बहिरंग योग असे म्हणतात. त्यामध्ये यम,नियम म्हणजे स्वतःला लावून घेतलेली काही बंधने आहेत. समाजात उत्तम प्रकारे राहण्यासाठी अशी बंधने असणे आवश्यक आहे यालाच सामाजिक व वैयक्तिक नातीनियम म्हणतात. ज्यामुळे आदर्श जीवनपद्धतीची पायाभरणी होते. आसनां मुळे शरीराला स्थिरता येते, शरीर हलके होते व आरोग्यप्राप्ती होते तसेच प्राणायाम व प्रत्याहार या दोन अंगामुळे श्वसन आणि मनावर ताबा ठेवण्यास मदत होते.त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायूचा जास्तीत जास्त पुरवठा होऊन प्रत्येक अवयवांचे कार्य सुधारते,मनावर ताबा ठेवून भावनांचा तोल राखण्यास मदत होते.
योगाची शेवटची तीन अंगे म्हणजेच धारणा,ध्यान व समाधी यांना अंतरंग योग असे म्हणतात. यामुळे योग्याला आत्मिक उन्नती साधण्यास मदत होते. या तीन तत्त्वांचा अभ्यास योग शास्त्रामध्ये फार महत्त्वाचा आहे. योग साधनेचा शारीरिक व्याधीपेक्षा मानसिक आजारावर अत्यंत चांगला फायदा होतो. अमेरिकेचे प्रसिद्ध मनोवैज्ञानिक बर्थ सेलोन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की ज्याप्रमाणे सकारात्मक विचार आजारा बरे होण्यास मदत होतात त्याचप्रमाणे नकारात्मक विचार हे आजार निर्माण करण्यास कारणीभूत असतात मनुष्याचे ९०% आजार फक्त आणि फक्त त्याच्या मानसिक अस्वास्थेतून निर्माण होतात कारण मन आणि शरीराचा निकटचा संबंध असतो. म्हणजेच शरीराचे आजार आणि व्याधी या मनाची देणगी आहेत. शारीरिक व्याधींचा मनावर तसेच मानसिक विकारांचा शरीरावर परिणाम होत असतो किंबहुना मनाचा शरीरावरचा पगडा जास्त आहे.ताण-तणाव नैराश्य,काळजी, अपमान,मनासारखे न होणे,भीती यासारख्या अनेक विविध कारणांनी आपल्या मनावर परिणाम होत असतो. तो चिडचिड,झोप न लागणे, कशात लक्ष न लागणे,अन्नावरची वासना उडणे अशा मनात वरील परिणामातून व्यक्त होत असतो. भिती मुळे हृदयाची गती वाढते, भूक मंद होते तसेच शारीरिक व्याधी वाढतात. तर रागा मुळे एड्रिनलीन नावाचे हार्मोन्स वाढतात त्यामुळे हृदयाची धडधड वाढते , फुप्फुसाअंतर्गत रक्ताभिसरण व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हे एड्रिनलीन नावाचे रसायन नियंत्रित ठेवण्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे.
चिंता हा प्रसिद्ध मानसिक आजार अतिभितीमुळे निर्माण होतो.या चिंतेने राग निर्माण होतो त्यामुळे रक्तांमध्ये विषारी तत्व तयार होऊन पचनक्रिया बिघडते,झोप लागत नाही.प्रसिद्ध विद्वान अर्नल्ड वन्नट यांच्या संशोधनानुसार ८०% चिंता,काळजी बिलकुल निरर्थक आणि हानिकारक असतात.
इर्षा,द्वेष यामुळे मानसिक विकृती निर्माण होतेच त्याचबरोबर कॅन्सर सारखे भयानक आजार ही निर्माण होतात. द्वेषामुळे रक्तामध्ये विषारी तत्व वाढवून ५० टक्के वात रोग निर्माण होतात असे मत अमेरिकन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ जोजेफ काइल यांनी लिहिले आहे. इर्षा,द्वेषा मुळे स्नायुंचे आखडणे, सांध्यामध्ये आकडन, रक्तसंचलनामध्ये अडचण निर्माण होऊन अवयव सुन्न पडतात. डॉ. गिलर्ड यांच्या संशोधनानुसार पचनासंबंधी अनेक विकार इर्षा,द्वेष या मुळे होतात. हे मानसिक आजार जास्तच वाढत गेली तर पागलपन (मनोरुग्ण)उत्पन्न होते. भिती, राग, चिंता, द्वेष, इर्षा त्याचबरोबर दुःख आणि आनंद या मनुष्याच्या भावना आहेत. भावना हे सुद्धा मनाचेच क्षेत्र आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर भावना विशुद्ध असतात व त्यामुळे शरीराला व मनाला क्लेश होत नाहीत. अन्यथा त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास होतात.भावनेचे मूळ कारण मनच असल्याने मानसिक आरोग्या करता मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे व ती गोष्ट योगामुळेच साध्य होऊ शकते. हीच आनंदी जीवन जगण्याची कला म्हणजेच आनंदयोग होय.
प्रा.धनंजय देशमुख (एम ए योगशास्त्र) ९२६०७१०७१०
आर्ट ऑफ लिव्हिंग व आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त योगशिक्षक.



