नीट परीक्षा पुन्हा होणार? आता 18 जुलैला होणार फैसला!
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हाेणार हाेती. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै राेजी हाेणार आहे.
केंद्रासह एनटीएने सादर केले शपथपत्र
नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) ने ८ जुलै रोजी शपथपत्र दाखल करावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ने शपथपत्रे दाखल केली होती. केंद्राने असे म्हटले आहे की, आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांनी केलेल्या डेटा ॲनालिटिक्स अभ्यासानुसार परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. तर NTA ने म्हटले आहे की ,टेलिग्राम ग्रुप्समधील NEET पेपर लीक झाल्याचे दाखवणारे व्हिडिओ बनावट आहेत. केंद्र आणि एनटीएने त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड झालेली नाही.
‘नीट’परीक्षा वाद, आतापर्यंत काय घडलं?
५ मे २०२४ रोजी नीट परीक्षा झाली. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.
तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. तर काहींना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्यानेच पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आरोप करण्यात आला.
NTA ने 8 जून रोजी वाढीव गुणांच्या चौकशी करण्यासाठी समिती स्थापन.
परीक्षेनंतर आठ दिवसांनी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पहिली याचिका दाखल.
बिहार पोलिसांनी ५ मे रोजी पेपरफुटीच्या संशयावरून १३ जणांना अटक केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी पेपर फुटल्याचा आरोप फेटाळला.
NEET उमेदवार शिवांगी मिश्रा यांनी 13 मे रोजी पेपर फुटीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल.
१३ जून रोजी १,५६३ उमेदवारांना देण्यात आलेले ग्रेस गुण रद्द.
13 जून रोजी, NTA ने 1563 अतिरिक्त गुणांसह उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यापैकी 813 उमेदवार परीक्षेला बसले तर 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत.
NTA ने 23 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर 1 जुलै रोजी सुधारित गुणवत्ता यादीही जाहीर केली होती.या परीक्षेनंतर पैकीच्या पैकी गुण मिळवणार्या ६७ उमेदवारांची संख्या ६१ वर आली आहे.
८ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले होते की, “परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, सुमारे 24 लाख, पुन्हा चाचणीचे आदेश देणे योग्य होणार नाही. तसेच अशा अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून न्यायालय NEET परीक्षेच्या ‘पावित्र्या’बद्दल काळजीत आहे. याची चौकशी करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली असेल, तर त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा.”
११ जुलै : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै राेजी हाेणार असल्याचे स्पष्ट केले.