महाराष्ट्र

मनोज जरांगेंवर आरोप करणारे अजय महाराज बारसकर आहेत तरी कोण?

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले हभप अजय महाराज बारसकर हे कोण आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. बारसकर यांनी २०१४ मध्ये अभिनेत्री आणि राजकारणी दिपाली सय्यद यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढवली होती.

वैयक्तीक माहिती

अजय महाराज बारसकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालगावचे आहेत. एका वारकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून सध्या त्यांचं वय ४५ वर्षे आहे. बीएपर्यंतच त्यांचं शिक्षण झालं असून त्यांनी नगरच्या विखे पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही केला आहे. तसचे नगरच्याच सीएसआरडी कॉलेजमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे.

राजकीय वाटचाल

सन २०१४ मध्ये अजय बारसकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना सहाव्या क्रमांकाची मतं मिळाली होती. ‘बहुजन मुक्ती पार्टी’ या पक्षाकडून ही निवडणूक लढवणाऱ्या बारस्करांना ६,००३ इतकी मत मिळाली होती. त्यांच्या वर पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांना ७,१२० इतकी मतं मिळाली होती. दिपाली सय्यद यांना आम आदमी पार्टीनं उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी निवडणूक जिंकली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे राहिले होते तर तिसऱ्या क्रमांकावर माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील हे होते. यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटना या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्षही राहिले. नुकताच त्यांनी मनोज जरांगेंवर आरोप केल्यामुळं त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.

जरांगेंसोबत मराठा आंदोलनात सहभाग

मनोज जरांगे यांच्या आंदोलनातही सहभागी होते. आंदोलनातील जरांगेंचे जवळचे सहकारी म्हणूनही त्यांना ओळखलं जात होतं. जरांगेंसोबत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेवेळीही बारसकर त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २००६ पासून आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रवचनकार ते लेखक

प्रवचनकार तसेच एक लेखक म्हणूनही बारसकर यांची ओळख आहे. त्यांनी आजवर दहापेक्षा अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधीत ‘तुका सेज’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही बारसकर यांनी लिहिलं आहे.

प्रवकचनकार, लेखक यांसह शाहीर, कवी, व्याख्याते, प्रबोधनकार, शिक्षक, कायद्याचे अभ्यासक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना

अजय बारसकर यांनी सन 2018 मध्ये देहू इथल्या भंडारा डोंगर इथं संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा, संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button