अखेर गृहमंत्रालयाने घेतली माघार; पोलिसांच्या रजा रोखीकरण बंदचा जीआर रद्द
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पोलीस शिपाई ते पोलिस निरीक्षकांपर्यंत १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता. या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलातून नाराजीचा सूर उमटला होता. ‘लोकसत्ता’नेही याबाबत पाठपुरावा केला होता. यानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेत हा अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील पोलिसांना १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत दिली जात होती. मात्र, २१ फेब्रुवारीला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय जारी करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या या सवलतीवर गदा आणली. गृहमंत्रालयाने अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता. त्यानंतर संपूर्ण राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अनेक अधिकाऱ्यांना समाजमाध्यमांवरून गृहमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करून आपली खदखद व्यक्त केली होती. अन्य शासकीय विभागाप्रमाणे शनिवार-रविवार सुटी नसल्यामुळे अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लागू केली होती. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सवलत रद्द केल्यामुळे राज्यभर असंतोष पसरला होता.
अनेक पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी फेसबुक, ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता. तसेच ‘लोकसत्ता’नेही पोलीस कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत ‘रजा रोखीकरण केल्यामुळे पोलीस दलात नाराजी’ असे वृत्त प्रकाशित केले होते. दोन दिवसांतच गृहमंत्रालयाने रजा रोखीकरण रद्द केल्याबाबतचा शासन निर्णय मागे घेतला. त्यामुळे राज्यातील पोलिसांना दिलासा मिळाला. शासन निर्णय रद्द झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे.
रजा रोखीकरण म्हणजे काय?
राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही ३० दिवसांच्या हक्काच्या अर्जीत रजा असतात. मात्र पोलिसांनी त्या रजा उपभोगता येत नाही. तसेच पोलिसांना शनिवार-रविवार सुट्टीसुद्धा नसते. सण-उत्सवातही सुट्या घेता येत नाही. ही बाजू लक्षात घेता सरकारने पोलिसांना १५ दिवसांच्या रजा रोखीकरणाची सवलत देण्यात आली होती.
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे रक्कम द्यावी
राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना १९८९ पासून वर्षांला १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा व निवृत्त होताना रजेचे रोखीकरण (एन्कॅशमेंट) करण्याची सुविधा लागू केली आहे. मात्र, रजा रोखीकरणाचे पैसे हे सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येतात. सध्या सातवा वेतन आयोग लागू असल्याने रजा रोखीकरणाची रक्कम नव्या वेतन आयोगाच्या तफावतीनुसार देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.