महाराष्ट्र

जीवन जगत असताना आपण आपल्याच मनाची समजूत काढून संयमाने जगणे म्हणजेच खर आयुष्य -फँड्री आणि बरच काही-महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक –हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.97 30 867 448

लेखक/दिग्दर्शक श्री.नागराज पोपटराव मंजुळे यांनी जो फँड्री नावाचा चित्रपट काढला. त्यामध्ये किती वास्तव दाखवलेलं आहे. ग्रामीण भागातील संपूर्ण जीवन आणि व्यक्तिरेखा दाखवल्या आहेत. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती खस्ता खाव्या लागतात. ग्रामीण भागातील खालच्या दर्जाचे जीवन आणि गावाकडील दिलेली वागणूक आणि बरच काही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न यामधून झालेला आहे. एक खर प्रेम आणि जाती धर्माच्या भिंती आणि घरची गरीब परिस्थिती यामुळे होत असलेला त्रास आणि प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार झालेलं एक वेड मन.

गावाकडील लोकांची मानसिकता आणि खालच्या दर्जाची मिळालेली वागणूक यामधून पहायला मिळते. एकदम हुबेहूब अस वर्णन यामधून झालेलं आहे. फँड्री मुळात संकल्पना किती काय सांगून जाते. शाळेतील वय, आईवडिलांसमोर , संपूर्ण शाळेसमोर आणि आपल्या प्रेमिके समोर झालेला आपला अपमान मनात ठेऊन जीवन जगणारा तो बाल नायक. आयुष्य किती काही शिकवून जाते ना..! आजही काही गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर हे चित्र जसच्या त्या तस पाहायला मिळत. गावातील लोकांचं बोलणं, अपमानस्पद मिळालेली वागणूक आणि स्वाभिमानास गेलेला तडा. या सर्व गोष्टी यामधून प्रकर्षाने जाणवतात.

आज एकविसाव्या युगात जगत असताना हा जर माणूस जाती धर्माच्या पलीकडे जायला तयार नसेल तर मला वाटत कुठेतरी हे चित्र बदललं पाहिजे. एक माणूस म्हणून सर्वांना वागणूक ही मिळाली पाहिजे. आपलं प्रेम आणि घरची परिस्थिती लपून राहण्यासाठी केलेला जीवाचा अट्टापिटा यामधून पहायला मिळतो. खर तर अलीकडे प्रेम नावाची संकल्पना च मुळात बदलत चालली आहे. “काळी चिमणी” ही संकल्पना किती भावुक करून सोडते. प्रेम आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी इथे मनात घर निर्माण करतात.

आणि बरच काही सांगून शिकवून जातात. समाजात मिळणारी कमीपणाची वागणूक आणि जगायला न मिळालेलं स्वातंत्र्य. किती माणूस लाचार होऊन जगतो उगीच विनाकारण म्हंटल तरी चालेल का? परिस्थिती आणि अशिक्षितपणा माणसाला तस राहायला भाग पाडतो. जगायला भाग पाडतो. माणूस आतून पूर्णपणे तुटतो आणि शेवटी हातातून वाळू जशी निसटावी तस आयुष्य निसटून जात. आपण मात्र मोकळ्या हातांनी येतो आणि मोकळ्या हातानी निघून जातो. परिस्थितीच्या निवदाला मग कावळे टोच्या मारुन मारून खातात. मन आतून कुरतडल जात.

सगळे संकटे एकदाच आल्यासारखी वाटायला लागतात. नेमकं हेच त्या फँड्री च्या माध्यमातून सांगितलं आहे. आजपर्यंत चा प्रत्येकांचा एक अनूभव मात्र राखीव असतो की खर प्रेम कधीच कोणाला मिळत नाही. आणि जरी भेटलचं तर ते लवकर कोणाला कळत नाही. आयुष्यभर माणूस हा माणूसच राहतो. आयुष्य मात्र असच जगत राहतो. “जब्या” काय कॅरेक्टर आहे राव. नंबर एक. नाद करायचा नाही.

आहे तस पाहिजे तस आयुष्य जगता नाही आलं तर समजून घेऊन जीवन जगत असताना आपण आपल्याच मनाची समजूत काढून संयमाने राहणे म्हणजे खर आयुष्य. पण हे कुठपर्यंत शक्य आहे जोपर्यंत आपला संयम आहे तिथपर्यंत. जन्मदेणाऱ्या आईबापाला आपल्या डोळ्यासमोर जर कोणी काय वाईट बोललं तर आपण गप्प नाही बसू शकत बरोबर ना…नेमकं तेच जब्यान चित्रपटाच्या शेवटी केलं. खर तर हा चित्रपट नाहीच हे एक चालत बोलत देशातील वास्तव आहे. खरच खूप भयानक अस वास्तव आहे…!

लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9146133047/9579228347

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button