भारत महाविद्यालय शैक्षणिक दर्जाबाबत तालुक्यात प्रथम असून नॅक समिती कडून सूचित केलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार,: माजी आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
भारत महाविद्यालयाचे नॅक कडून करण्यात आलेले मूल्यांकन संस्था आणि संपूर्ण स्टाफ साठी उत्साह वाढवणारे ठरणार असल्याचा ठाम विश्वास भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला. देशातील अग्रगण्य अशा नॅक समिती कडून मूल्यांकन करण्यात आले.
यामध्ये या महाविद्यालयाने ‘ बी प्लस’ हा दर्जा प्राप्त केला. करमाळा तालुक्यात भारत महाविद्यालय आता दर्जाचा विचार केला असता प्रथम क्रमांकावर आहे. याबाबत समाधान व्यक्त करताना संस्था अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले की नॅक समिती मध्ये देशातील इतर राज्यात विद्यापीठ स्तरावर कुलगुरू तसेच इतर महत्वाच्या पदावर काम करत असलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. देशातील शिक्षण प्रणाली मध्ये असणारे बदल, परिणाम याची जाण असणारी ही समिती होती.
यामुळे भारत महाविद्यालयाच्या शिक्षण व्यवस्था, शैक्षणिक यश, विद्यार्थ्यासाठी भौतिक शैक्षणिक सुविधा, सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने दिलेले योगदान, शिक्षण पद्धती, स्वच्छ्ता, शिस्त, शिक्षणासह क्रीडा व सांस्कृतिक विभागात मिळालेले यश, प्राध्यापकांनी स्वतः चे अद्यावत केलेले ज्ञान, प्रबंध तसेच या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधा या सह अनेक बारकावे या समितीकडून तपासून पाहण्यात आले.
यामुळे महाविद्यालयास मिळालेला दर्जा संस्थेच्या प्रगतीत भर घालणारा असून यातील त्रुटी सोडविण्यावर आपण भर देणार आहोत. आगामी काळात करमाळा तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे भारत महाविद्यालय असणार आहे. या महाविद्यालयाची आर्ट शिवाय आणखी इतर फॅकल्टी किंवा विद्यार्थांना उद्योग देणारे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करण्याचा आपला मानस असणार आहे.
भारत महाविद्यालय तसेच भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनी साठी निवासाची सोय असलेले मुलींचे वसतिगृह उभारण्याचा आपला प्रयत्न राहील असेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्था उपाध्यक्ष अनिलकुमार गदिया, सचिव प्रा अर्जुनराव सरक, संचालक संदीप कोठारी, संजयकुमार दोशी, प्राचार्य डॉक्टर अनंतराव शिंगाडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.